MPSC मध्ये यशस्वी ठरलेल्या विजय लंकेश्वर यांचा महामानव संस्थेकडून सन्मान
महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा आदर्श उपक्रम – यशस्वी युवकाचा गौरव
B1न्यूज मराठी नेटवर्क
विजय कल्याण लंकेश्वर यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षेत यश
बार्शी : तालुक्यातील श्रीपतपिंपरी येथील विजय कल्याण लंकेश्वर यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर MPSC परीक्षेत यश मिळवत महसूल सहाय्यक पद मिळवले आहे. १० एप्रिल २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केले.
विजय लंकेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. प्रा. शाळा, श्रीपतपिंपरी येथे झाले. त्यानंतर त्यांनी लोकसेवा विद्यालयातून १० वी पूर्ण केली व बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातून ११ वी-१२ वी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी बी.ए. (राज्यशास्त्र) व एम.ए. (राज्यशास्त्र) शिक्षण पूर्ण करून २०२१ पासून MPSC परीक्षेची तयारी सुरू केली होती.
अत्यंत गरीब कुटुंबातील परिस्थितीत आई – वडिलांनी शेतमजुरी करून मुलाला शिक्षण दिले. त्यांच्या कष्टाचे चीज करत विजय यांनी अधिकारी पद मिळवून कुटुंबाचा आणि गावाचा मान उंचावला आहे. त्यांच्या यशामागे भाऊ सिद्धार्थ लंकेश्वर यांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. नुकताच महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांचा पुस्तक, गुलाब व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार युवा उद्योजक सुमित माळी व युवा नेते सुनिल चौधरी यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी, किरण खुरंगळे, सचिन चौधरी, सुमित माळी, अधिरा चौधरी, दिपाली चौधरी, रंजना खुरंगळे, समाधान चौधरी, नाना शिंदे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केली, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.
गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि अनेक अडचणींचा सामना करत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या युवकांची कथा समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरते. अशाच प्रेरणादायी प्रवासाची नोंद बार्शी तालुक्यातील विजय लंकेश्वर यांनी केली असून, त्यांनी MPSC परीक्षेत यश मिळवत महसूल सहाय्यक पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण गावाचे नाव उज्ज्वल झाले असून, संघर्षातून उभ्या राहिलेल्या या यशकथेचा सर्वत्र गौरव होत आहे.
विजय लंकेश्वर यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.






