बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे १ एप्रिलपासून श्री भैरवनाथ यात्रा महोत्सवाचा थरार; पाच दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्री भैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अत्यंत उत्हासात आणि शाही थाटात साजरी होणार आहे. बुधवार दिनांक ०१/०४/२०२६ ते रविवार दिनांक ०५/०४/२०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा भव्य ‘यात्रा महोत्सव’ रंगणार आहे. या निमित्ताने सुर्डी ग्रामस्थ आणि समस्त पंच कमिटीने धार्मिक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांचे जय्यत आयोजन केले आहे.
असा असेल पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम:
यात्रेची सुरुवात बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी होणार आहे. हनुमान जयंतीचे औचित्य साधून ठीक रात्री ९ वाजता पंढरपूर येथील ख्यातनाम कीर्तनकार ह.भ.प.श्री. वैजिनाथ जगदाळे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होईल.
गुरुवार दिनांक २ एप्रिल रोजी सकाळी यात्रेच्या मुख्य विधींना सुरुवात होईल. ठीक सकाळी ८ वाजता वाजत-गाजत देवाला देवळात आणले जाईल. त्यानंतर रात्री ९ वाजता युवा पिढीच्या आवडीचा ‘झंकार बँजो व शौकीन ताफे’ यांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाईल.
शुक्रवार दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारपासून यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचेल. दुपारी ४ वाजता माळ्याच्या मळ्यातून वाजत-गाजत ‘सासन काटी’ देव मंदिरात आणली जाईल. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. त्यानंतर रात्री मनोरंजनाची मेजवानी असेल. रात्री १० वाजल्यानंतर पारंपारिक ‘सोंगाचा कार्यक्रम’ आणि रात्री १२ वाजता पिसेवाडी (माळशिरस) येथील विजय म्युझिकल नाईट आयोजित ‘विजया ऑर्केस्ट्रा’ चा रंगारंग कार्यक्रम होईल.
शनिवार दिनांक ४ एप्रिल हा दिवस कुस्ती शौकिनांसाठी खास असणार आहे. दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत श्री भैरवनाथ अन्नछत्र मंडळातर्फे सर्व भाविकांसाठी ‘महाप्रसादा’ चे वाटप केले जाईल. दुपारी ४ वाजता यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले ‘जंगी कुस्त्यांचे मैदान’ रंगेल. यामध्ये प्रथम क्रमांकाची लढत पैलवान राहुल ठोंबरे आणि पैलवान रवी चव्हाण (पुणे) यांच्यात होणार असून, प्रथम पारितोषिक म्हणून १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख इनाम ठेवण्यात आले आहे. रात्री ९ वाजता ‘संगीता’ ऑर्केस्ट्रा, रात्री १० वाजता पुन्हा पारंपारिक ‘सोंगाचा कार्यक्रम’ आणि रात्री १२ वाजता देवाची शाही ‘छबिना’ मिरवणूक निघेल. या मिरवणुकीत बारामतीचा प्रसिद्ध ‘अमर बँड’ आणि नयनरम्य ‘शोभेची दारुकाम’ हे मुख्य आकर्षण असतील.
यात्रेचा समारोप रविवार दिनांक ५ एप्रिल रोजी होईल. रात्री ९ वाजता कोल्हापूर येथील सुभाष हिलगे निर्मित प्रसिद्ध ‘वैभव डान्स म्युझिकल नाईट’ आणि ऑर्केस्ट्राने यात्रेची सांगता होईल.
शांततेत यात्रा पार पाडण्याचे आवाहन:
सुर्डी येथील हा पाच दिवसांचा यात्रा महोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी समस्त पंच कमिटी आणि सुर्डी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. सर्व भाविक भक्तांनी पाचही दिवस उपस्थित राहून यात्रेचा आणि सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, तसेच यात्रा अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला आणि कमिटीला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन समस्त पंच कमिटी व सर्व ग्रामस्थ सुर्डी, ता. बार्शी, जि. सोलापूर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.





