नेट-सेट तयारीस नवी दिशा: डॉ. राहुल पालके यांचे उद्या सोलापूर विद्यापीठामार्फत इंग्रजी साहित्यावर मार्गदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या स्कूल ऑफ लँग्वेजेस अँड लिटरेचर्स अंतर्गत इंग्रजी विभागामार्फत रविवार, २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता नेट-सेट पेपर २ इंग्रजी साहित्यावर एकदिवसीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा गुगल मीट या माध्यमातून विनामूल्य व सर्वांसाठी खुली आहे.
या कार्यशाळेत संसाधन व्यक्ती म्हणून श्री शिवाजी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल पालके हे मार्गदर्शन करणार आहेत. ते नेट- सेट या परीक्षा २० वेळा ८ विषयात पात्र आहेत. तसेच त्यांनी नुकतेच गेट परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे. ते या कार्यशाळेत इंग्रजी साहित्यातील विविध वाड्.मय प्रकार जसे नाटक, कविता, कांदबरी, लघुकथा आणि अकाल्पनिक साहित्य याची चर्चा करणार आहेत.
तसेच ते या घटकांसह उतारा आकलनच्या माध्यमातून चिकित्सक वाचन, विचारप्रक्रिया, तार्किक व विश्लेषण क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.या सत्रात नेट-सेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप, रचना, गुण विभागणी, परीक्षेचा कट-ऑफ व सखोल विश्लेषण यावर विशेष चर्चा होणार आहे.
तसेच भाषा, भारतामधील इंग्रजी, संस्कृती अभ्यास, साहित्यिक समीक्षा, दुसऱ्या महायुध्दानंतरचे साहित्यिक सिद्धांत आणि संशोधन पद्धती या घटकांचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक जाण, संशोधन मूल्ये व मानवी मूल्ये रुजविण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यशाळेत रब्बाना शेख, सहाय्यक प्राध्यापक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते, हेही मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अंजना लावंड, संचालक, स्कूल ऑफ लँग्वेजस ॲण्ड लिटरेचरर्स,या असणार आहेत.
ही कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य खुली असून कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. गणेश संकपाळ व डॉ. व्ही. एल.लेंडवे हे आहेत. तरी इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.




