राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून समाजाने स्त्री सक्षमीकरणासाठी सहकार्य केले पाहिजे: डॉ. राहुल पालके
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : २१ व्या शतकात स्त्री शक्तीच्या विचारांचा जागर विविध क्षेत्रांत होत आहे. कला, विज्ञान, क्रीडा, समाजकारण, राजकारण, वाणिज्य, संचार, आरोग्य, दळणवळण, संरक्षण, संशोधन आदी क्षेत्रांत महिला कार्यरत आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन उपस्थितीत व गुणवत्तेत मुलांपेक्षा मुलींचा टक्का वाढत आहे. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात २१ व्या शतकातील इंग्रजी संप्रेषण कौशल्ये ही संकल्पना समोर ठेवून राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय समोर ठेवून समाजाने स्त्री सक्षमीकरणासाठी सहकार्य केले पाहिजे, असे मत याप्रसंगी डॉ. राहुल पालके यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. ए. बी शेख व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस.डी. पवार यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ. विजयकुमार भांजे हे या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रा. डॉ. राहुल पालके यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा करिअरचा कल जाणून घेतला. विद्यार्थ्यांनी प्रशासन, शिक्षण, संशोधन, संरक्षण, फॅशन आदी क्षेत्रात करिअर करून अधिकारी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, पोलिस, संरक्षण, आरोग्य अधिकारी, फॅशन डिझायनर होण्याची इच्छा व्यक्त केली.
पुढे बोलताना डॉ. पालके म्हणाले, उत्तराधुनिक कालखंडात महिला गतिमान होत आहेत. परंतु आजही समाधानकारक प्रगती नाही. भारत तसेच महाराष्ट्रातील बाल गुणोत्तर याचे प्रमाण चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी समाजाच्या पाठिंब्याची गरज व्यक्त केली. सामाजिक व आर्थिक स्वावलंबनातून मुलींनी स्वतःला सिद्ध करावे. सिमॉन दी बॉव्हा, एलेन शोवाल्टर , ज्युलिया क्रिस्तेवा, वर्जिनिया वुल्फ , गेल ऑम्वेट यांची स्त्रीबाबतची निरीक्षणे त्यांनी मांडली. राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी स्त्री सक्षमीकरणाच्या विविध चळवळींचे दाखले दिले.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे दाखले देवून स्त्री शक्तीच्या विचारांचा जागर केला. याचबरोबर विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संभाषण कौशल्ये अवगत करावीत हे सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा संप्रेषण कौशल्ये या विषयावर गटचर्चा केली. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही मूलभूत कौशल्ये आत्मसात करणे काळाजी गरज आहे. शब्दकोश, विश्वकोश, संदर्भग्रंथ, मासिके इ. ची आवश्यकता त्यांनी प्रस्तुत झाली. ॲप्स, क्रिकेट मॅच, हॉलीवूड सिनेमा,न्यूज हेडलाईन्स, डिसकव्हरी , टेड टॉकस आदीमधून इंग्रजी संभाषण शिकण्याची गरज व्यक्त झाली.
वर्तमानपत्रातील संपादकीय लेख यांचे वाचन करणे गरजेचे आहे असाही युक्तिवाद करण्यात आला. यामधून ज्ञानाबरोबरच कौशल्ये आत्मसात करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखवली. बी.एस्सी.शाखेमधील ९० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातून स्त्री-पुरुष समानतेची धारणा स्पष्ट झाली तसेच एकता व एकात्मतेचा संदेश देण्यात आला.




