येडशीतील दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा माणुसकीचा आधार ! स्वखर्चातून पाच लाखांची आर्थिक मदत ; मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव दि.२६ नोव्हेंबर : येडशी येथे काही दिवसांपूर्वी किराणा मालाचे दुकान आणि घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला होता.या भीषण संकटातून विलक्षणरीत्या बचावलेल्या कुटुंबातील एका सदस्याच्या आयुष्यात पुन्हा उभे राहण्याची उमेद निर्माण व्हावी,या संवेदनशील भावनेतून पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे.
या दुर्घटनेत सर्वस्व गमावलेल्या आणि कुटुंबातील सहा सदस्यांना मुकलेल्या व्यक्तीला जगण्याचा आधार मिळावा,यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या स्वखर्चातून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येत त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.
दरम्यान,या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबतही मंत्री सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. शासनाकडे यापूर्वी पाठविण्यात आलेल्या मदतीच्या प्रस्तावात आवश्यक दुरुस्ती करून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसांना स्वतंत्रपणे प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी,अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एका भीषण दुर्घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यानंतर मागे उरलेल्या व्यक्तीला केवळ आर्थिक मदतीचीच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिक आधाराचीही नितांत गरज असते.ही जाणीव ठेवून प्रताप सरनाईक यांनी केलेली मदत आणि शासनाकडे केलेली पाठपुराव्याची मागणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.
‘संकटात सापडलेल्या माणसाच्या पाठीशी उभे राहणे,हीच खरी लोकसेवा’ या भावनेतून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दाखविलेली संवेदनशीलता धाराशिव जिल्ह्यात माणुसकीचा दिलासा देणारी ठरली आहे.




