दूरसंचार अधिकार आणि विशेषाधिकार विषयावरील ग्राहक जागरूकता कार्यशाळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (WIT) यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग शाखेतील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जागरूकता अभियान कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.
या अभियानात ‘दूरसंचार अधिकार आणि विशेषाधिकार’ या विषयावर प्रादेशिक प्रमुख आणि सल्लागार, TRAI प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरूचे श्री ब्रजेंद्र कुमार यांनी सखोल मार्गदर्शन केले. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ग्राहकांचे मूलभूत हक्क, विशेषाधिकार, सेवा वापरताना घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. ग्राहकांनी दूरसंचार सेवा अधिक प्रभावीपणे कशा वापराव्यात आणि त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे सेवा सुधारण्यासाठी कोणत्या सूचना देता येतील, याविषयी देखील चर्चा झाली.
दुसऱ्या सत्रात सायबर क्राईम ग्रामीण पोलिस स्टेशन, सोलापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री रोहित पवार यांनी ‘सायबर सुरक्षा, सायबर गुन्हे आणि आर्थिक साक्षरता’ यावर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत इलेक्ट्रॉनिक अँड कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभाग प्रमुख डॉ. सचिन गेंगजे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ संशोधन अधिकारी, TRAI प्रादेशिक कार्यालय, बेंगळुरूचे श्री के. मुरलीधर यांनी केले.
या कार्यक्रमाला इलेक्ट्रॉनिक्स अँडटेलीकम्युनिकेशन इंजिनियरिंग विभाग प्रमुख डॉ. आशा थळंगे, प्राध्यापक, तसेच सोलापुरातील विविध टेलिकॉम सेवा प्रदात्या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. रोहिणी मेरगु, अमेय सांगोळे आणि रिया फरसुले यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शंका समाधान सत्राचे आयोजन करण्यात आले. आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. श्रीशैल स्वामी यांनी केले. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, त्यांनी दूरसंचार सेवा व सायबर सुरक्षेबाबत अधिक जागरूक राहण्याचे महत्व अधोरेखित केले.