सचिन वायकुळे लिखित ‘तिमिर छेदताना’ पुस्तकाचे दीपक आर्वे यांच्या हस्ते प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या अस्वस्थता आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत लेखक सचिन वायकुळे यांचे ‘तिमिर छेदताना’ हे पुस्तक मनाला उभारी देणारे आणि निराशा दूर करणारे आहे, असे प्रतिपादन निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांनी केले. कोल्हापूरस्थित आविष्कार फाऊंडेशनच्या वतीने बार्शीतील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात लेखक सचिन वायकुळे यांच्या ‘तिमिर छेदताना’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल देशमाने होते.
या कार्यक्रमाला आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, लेखक सचिन वायकुळे, जब्बार शिकलगार, प्राचार्या डॉ. सुनिता केदार, लेखक वायकुळे यांचे वडील निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, आई विमल मदनराव वायकुळे, ऍड. शांताराम पाटील, दिपाली माने, पवन पवार, ए. बी. शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
दीपक आर्वे पुढे म्हणाले, अनाथपणा वाट्याला येऊनही स्वतःच्या आयुष्याचा कुंभार होत जीवनाकडे पाहणारे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे जीवन सर्वांसाठी प्रेरक आहे. तरुणांनी समस्यांमुळे निराश न होता, त्याला पाठ न दाखवता समर्थपणे वाटचाल करावी, यासाठी आत्मविश्वास वाढविणारे हे पुस्तक आहे, असे लेखक वायकुळे यांनी सांगितले.
आविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांनी प्रास्ताविकात पुस्तकातील अनेक संदर्भ देत कौतुक केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. देशमाने यांनीही पुस्तकाचे महत्त्व विशद केले. माधुरी सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.