नवी मुंबई महानगरपालिका आंतर शालेय सांस्कृतिक चषक स्पर्धा जल्लोषात संपन्न

0

सर्वोत्तम गुण संपादन करत ऐरोलीचे विबग्योर हायस्कूल सांस्कृतिक चषकाचे मानकरी

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी मुंबई : सुनियोजित अशा आधुनिक शहराप्रमाणेच सांस्कृतिक शहर ही नवी मुंबईची ओळख दृढ करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून नव्या पिढीमध्ये कला व संस्कृती जोपासना करण्यासाठी शालेय पातळीवर विविध कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या सर्वच स्पर्धांना लाभलेला मोठ्या प्रमाणावरील सहभाग लक्षात घेता या उपक्रमामागील उद्दिष्ट साध्य होत असल्याबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषकांतर्गत गायन, नृत्य, लघुनाटिका, पथनाट्य अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चार हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होत अंगभूत कलागुण प्रदर्शित करून सर्वच स्पर्धा यशस्वी केल्या.

त्यांचा पारितोषिक वितरण सोहळा महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते, सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे व सुप्रसिद्ध अभिनेते नृत्य कलावंत नकुल घाणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे संपन्न झाला. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाच्या उपायुक्त श्रीम. अभिलाषा म्हात्रे पाटील, महापालिका सचिव श्रीम. चित्रा बाविस्कर, शिक्षण विभागाच्या उपायुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, क्रीडा अधिकारी रेवाप्पा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.

गायन स्पर्धेचे परीक्षक म्हणून बोलताना सुप्रसिद्ध संगीतकार श्री राहुल रानडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पारितोषिक मिळणे ही पुढची गोष्ट मात्र सहभाग घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. उत्तम गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुरांवर अधिक बारकाईने लक्ष द्यावे व रियाज करण्यावर भर द्यावा अशा सूचना केल्या.
लोकप्रिय अभिनेते व नृत्य कलावंत नकुल घाणेकर यांनी सहभागी नृत्य समूहांनी जास्तीत जास्त भारतीय संगीत व नृत्य शैलीमध्ये सादरीकरण केले याचा विशेष उल्लेख केला. कोणतीही नृत्यशैली किंवा कला शिकताना गुरु हवाच हे त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले.

नवी मुंबई महानगरपालिका विद्यार्थ्यांमधील कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी इतक्या भव्य स्वरूपात स्पर्धा आयोजित करते ही खूप मोठी गोष्ट असल्याचे दोन्ही परीक्षकांनी प्रामुख्याने नमूद केले व शुभेच्छा दिल्या. गायन, नृत्य, लघुनाटिका, पथनाट्य आणि दिंडी अशा 5 स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना अनुक्रमे 100, 75 व 50 गुण प्रदान करण्यात आले होते. या पाचही स्पर्धांमिळून सर्वोत्तम गुण संपादन करणाऱ्या शाळांना नमुंमपा आंतरशालेय सांस्कृतिक चषक 2024 – 25 प्रदान करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. हा चषक सर्वाधिक 325 गुण संपादन करीत ऐरोली सेक्टर 8 ए येथील विबग्योर स्कूल यांनी पटकाविला.

गायन स्पर्धेमध्ये एकूण 54 शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामधील लहान व मोठ्या दोन्ही गटांतून प्रत्येकी 10 शाळांची प्राथमिक फेरीचे परीक्षक श्री ऋग्वेद देशपांडे यांनी अंतिम फेरीसाठी निवड केली होती. सुप्रसिद्ध संगीतकार श्री राहुल रानडे यांनी अंतिम फेरीचे परीक्षण करत पहिली ते पाचवीच्या लहान गटातून विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची प्रथम क्रमांकासाठी तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 42 घणसोली यांची द्वितीय क्रमांक व सरस्वती विद्यालय ऐरोली यांची तृतीय क्रमांकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुककशेत यांना महानगरपालिका शाळेचे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. अशाच प्रकारे सहावी ते दहावी या मोठ्या गटातील गायन स्पर्धेत मॉर्डन स्कूल वाशी हे प्रथम क्रमांक, श्रीराम विद्यालय ऐरोली हे द्वितीय क्रमांक आणि चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूल ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

नृत्य स्पर्धेमध्ये एकूण 65 शाळांनी सहभाग घेतला होता. त्यामधील लहान व मोठ्या दोन्ही गटातून प्रत्येकी 10 शाळांची अंतिम फेरीसाठी निवड नृत्यांगना प्रिया समर्थ यांनी प्राथमिक फेरीचे परीक्षण करताना केली होती. अंतिम फेरीचे परीक्षण सुप्रसिद्ध अभिनेते तथा नृत्य कलावंत नकुल घाणेकर यांनी केले. त्यांनी पहिली ते पाचवीच्या लहान गटात तेरणा विद्यालय प्रायमरी स्कूल नेरूळ हे प्रथम क्रमांक, प्राथमिक विद्यामंदिर बेलापूर हे द्वितीय क्रमांक आणि सरस्वती विद्यालय ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित केले.

त्याचप्रमाणे सहावी ते दहावीच्या मोठ्या गटात नमुंमपा शाळा क्रमांक 47 राबाडे हे प्रथम क्रमांकाचे, पीव्हीजी विद्याभवन इंग्लिश स्कूल नेरूळ हे द्वितीय क्रमांकाचे व विबग्योर हायस्कूल ऐरोली हे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. नमुंमपा शाळा क्रमांक 15 शिरवणे यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

लघुनाटिका स्पर्धेमध्ये 28 शाळांनी सहभाग घेतला होता त्यामधील दहा शाळांची अंतिम फेरीसाठी निवड नाट्य दिग्दर्शक संकेत तांडेल यांनी केली. अंतिम फेरीचे परीक्षण करताना सुप्रसिद्ध अभिनेता श्री.विकास पाटील यांनी विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची प्रथम क्रमांक, विद्याभवन प्राथमिक मराठी शाळा नेरूळ यांची द्वितीय क्रमांक व नमुंमपा शाळा क्रमांक 46 गोठिवली यांची तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 91 विशेष पारितोषिकाची मानकरी ठरली. त्याचप्रमाणे श्रीराम विद्यालय ऐरोली व नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुकशेत यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. विबग्योर हायस्कूलचा अल्हाद सुर्वे व विद्याभवन प्राथमिक मराठी शाळेची अनुष्का गोळे हे उत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि अभिनेत्री पारितोषिकाचे मानकरी ठरले.

पथनाट्य स्पर्धेमध्ये 23 शाळांनी सहभागी घेतला. त्यामधून सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक श्री देवेंद्र सरदार व श्री रवींद्र वाडकर यांनी 10 शाळांची अंतिम फेरीसाठी निवड केली. सुप्रसिद्ध कलावंत श्री अरुण कदम आणि श्री अनिल सुतार यांनी अंतिम फेरीत नमुंमपा शाळा क्रमांक 92 कुकशेत यांची प्रथम पारितोषिक, विबग्योर हायस्कूल ऐरोली यांची द्वितीय पारितोषिक व श्रीराम विद्यालय ऐरोली यांची तृतीय पारितोषिकासाठी तसेच नमुंमपा शाळा क्रमांक 49 दिवा ऐरोली यांची विशेष पारितोषिकासाठी निवड केली. नमुंमपा शाळा क्रमांक 78 गौतमनगर रबाळे आणि नमुंमपा शाळा क्रमांक 71 इंदिरानगर तुर्भे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

सर्व घटकांना सहभागी करून नवी मुंबईच्या एकात्मिक सांस्कृतिक विकासासाठी महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांचाही सहभाग या विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये घेण्यात आला असून दर्जेदार नागरी सुविधा पुरविण्याप्रमाणेच कला संस्कृतीला उत्तेजन देणारा सुसंस्कृत समाज घडवण्यासाठीही महानगरपालिका काम करीत असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्साही प्रतिसादामुळे विष्णुदास भावे नाट्यगृह भारून गेले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या