पु.ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅपीनेस इंडेक्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई, दि.३ : महाराष्ट्राचा हॅप्पीनेस इंडेक्स म्हणून पु. ल. देशपांडे यांचे कार्य असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भर त्यांनी घातली आहे. कला व सांस्कृतिक क्षेत्रातील मराठी कलाकारांचे तसेच रसिकाचे योगदान मोठे असून संगीत क्षेत्रात लता मंगेशकर, भीमसेन जोशी, आशा भोसले, नाटक आणि सिनेमा क्षेत्रात श्रीराम लागू, निळू फुले तर साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, त्याचबरोबर लोककला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी पोवाड्यातून मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, आमदार कालिदास कोळंबकर, भाई गिरकर, अपर मुख्य सचिव विकास खारगे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला एकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मराठी माणसाने नाटकाप्रती आपले प्रेम जोपासले आहे. नाटकाचे अनेक प्रयोग होतात, देशात या क्षेत्रात मराठी कलावंतांचे काम महत्त्वाचे आहे. गायक, कवी, साहित्यिक आदी सगळ्यानी आपली कला, साहित्य, संस्कृती याचे जतन करून आपल्या लोकांचे जीवन समृद्ध केले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पु.ल.अकादमी सारख्या वस्तू भविष्यात राज्यात तयार होतील. रवींद्रनाथ टागोर यांच्या नावाला साजेशे काम इथे झालेले आहे. मात्र, हे सातत्य पुढे टिकले पाहिजे. अशी अपेक्षा मुखमंत्री फडणवीस व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारने अत्यंत कमी वेळात या अकादमी आणि नाट्यगृहाचे नूतनीकरण केले आहे. रवींदनाथ टागोर आणि पु. ल. देशपांडे यांच्या नावाला साजेस काम याठिकाणी होत आहे. सध्या गावोगावी नाट्य मंदिराची अवस्था वाईट आहे. यासाठी संस्कृतीक कार्य विभागाने निधीची मागणी करावी, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी यावेळी दिली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड.आशिष शेलार म्हणाले, “कला साधक मंडळींच्या साधनेची जागा म्हणजे ही पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि रवींद्र नाट्य मंदिर आहे. त्यामुळे ही एक पवित्र वास्तू असून, सर्वार्थाने पावित्र्य टिकवणारी वास्तू आहे. त्यामुळे सांस्कृतिक उन्नती करणारे कार्यक्रम येथे होतील. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव 21 ते 24 एप्रिल 2025 ला पु. ल. अकादमीत होईल, अशी घोषणाही सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. शेलार यांनी यावेळी केली.