डिसेंबर व जानेवारी महिन्यातील सेवानिवृत्त नमुंमपा अधिकारी-कर्मचारी-शिक्षक सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आजवरच्या नावलौकिकात येथील अधिकारी, कर्मचारीवृंदाने केलेल्या कामाचा महत्त्वाचा वाटा असून सध्या पहिल्या फळीतील अनुभवसंपन्न अधिकारी, कर्मचारी, शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने हा एक प्रकारे संस्थेचा तोटा असल्याचे मत व्यक्त करीत प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी सेवानिवृत्तांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून माहे डिसेंबर 2024 मध्ये सेवानिवृत्त झालेले 10 व स्वेच्छानिवृत्ती स्विकारलेले 1 अशा एकूण 11 अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंदाचा तसेच माहे जानेवारी 2025 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या 6 अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंदाच्या सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ प्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
प्रत्येकाने आपापल्या पदाला साजेशा सेवा उत्तम रितीने बजावल्या त्यामुळे आपण सारेजण अत्यंत समाधानाने निवृत्ती स्विकारत आहात याचा आनंद व्यक्त करीत अनेक शासकीय कार्यालयात कामकाज केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी अधिक समर्पित भावनेने काम करतात असा स्वानुभव उपायुक्त शरद पवार यांनी सांगितला. यावेळी महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी डॉ.रत्नप्रभा चव्हाण तसेच इतरही कर्मचा-यांनी आपल्या सेवानिवृत्त होणा-या सहका-यांविषयी आपुलकीच्या भावना व्यक्त केल्या. सत्कारमूर्ती कर्मचा-यांनीही मनोगते व्यक्त करीत सत्काराबद्दल आभार मानले.
माहे डिसेंबर 2024 महिन्यात सेवा निवृत्त झालेले कार्यकारी अभियंता सुभ्राष सोनवणे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे, मुख्याध्यापिका रंजना वंशा, प्राथमिक शिक्षिक रोहिणी आवटे, वरिष्ठ लिपिक विश्वास कोळेकर, आरोग्य सहाय्यक पुजा वारके, वाहनचालक विठ्ठल जाधव, शिपाई बाळासाहेब कांबळे, मदतनीस गणेश नाईक, सफाई कामगार बालाजी सूर्यवंशी तसेच स्वेच्छानिवृत्ती स्विकारलेल्या शिपाई जया पाटील यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
तसेच जानेवारी 2025 महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले प्रशासकीय अधिकारी विलास मलुष्टे, मुख्याध्यापिका , सुनंदा डोके, मुख्यध्यापक , संजय मोरे, माहिती नोंदणीकार , भारती देशमुख, वाहनचालक, भरत बहाडकर, क्लीनर/सफाई कामगार सुनिल गायकवाड यांनाही सन्मानित करण्यात आले.