बार्शीचे महावीर कदम “फुल आयर्न मॅन” आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात सहभागी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शीतील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊनचे अध्यक्ष महावीर कदम यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे. ते 1 डिसेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियातील बसल्टन शहरामध्ये होणाऱ्या “फुल आयर्न मॅन” स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या प्रतिष्ठित स्पर्धेत कदम यांना एकूण 226 किलोमीटर अंतर 17 तासांच्या आत पूर्ण करावे लागणार आहे. यामध्ये 4 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे यांचा समावेश आहे. उष्णतेचे आव्हान, प्रतिकूल हवामान आणि कठीण मार्ग यामुळे ही स्पर्धा शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी ठरते. या स्पर्धेत जगभरातील 100 पेक्षा जास्त देशांमधील 3400 स्पर्धक सहभागी होणार आहेत.

महावीर कदम यांनी याआधी गोव्यातील आंतरराष्ट्रीय “हाफ आयर्न मॅन” स्पर्धा, नागपूरमधील “टायगर मॅन 183” आणि अनेक हाफ व फुल मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे त्यांची “फुल आयर्न मॅन” स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कदम यांनी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईहून ऑस्ट्रेलियाकडे प्रयाण केले आहे. त्यांच्या या यशामुळे बार्शी शहर आणि समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.बार्शीचा हा कर्तृत्ववान उद्योजक जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करण्यासाठी सज्ज आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या