करमाळा अॅट्रॉसिटी व गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जामीन मंजूर; बार्शी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : करमाळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील (गु.र.नं. ४३९/२०२६) आरोपी स्वप्निल बाबुराव देवडकर याला बार्शी येथील विशेष न्यायालयाने अटी व शर्थींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला आहे. या गुन्ह्याचे गांभीर्य आणि फिर्यादीने केलेले गंभीर आरोप पाहता, या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की दि. १९/०५/२०२६ रोजी करमाळा येथील मौजे कंदर परिसरात फिर्यादी आनंद अशोक खांडेकर यांना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून अपहरण करून नेण्यात आले होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना गाडीत बसवून मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ केली. इतकेच नाही तर, आरोपींनी पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि प्रदिप कदम व त्याच्या कुटुंबीयांच्या पाया पडण्यास सक्तीने भाग पाडले. या संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरणही आरोपींकडून करण्यात आले होते.
याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या विविध कलमांन्वये (१२७(२), ११५(२), ३५१(२), १८९(२), १९०, १९१(२)) आणि अनुसूचीत जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ च्या कलम ३(१)(r), ३(१)(s) व ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी स्वप्निल देवडकर याने बार्शी येथील विशेष न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज (अर्ज क्र. ४१८/२०२६) दाखल केला होता. बचाव पक्षातर्फे अॅड. महेश जगताप यांनी युक्तिवाद करताना, “आरोपी निर्दोष असून त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. तपासाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे असून आता पोलीस कोठडीची गरज नाही,” असे मत मांडले.
या अर्जाला सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. दिनेश देशमुख यांनी कडाडून विरोध केला. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत विशेष न्यायाधीश यु. एल. जोशी यांनी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. “आरोपांचे गांभीर्य हे जामीन नाकारण्याचे एकमेव कारण असू शकत नाही, विशेषतः जेव्हा तपास बऱ्याच अंशी पूर्ण झाला आहे,” असे म्हणत न्यायालयाने आरोपीला ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
न्यायालयाने आरोपीवर काही अटी घातल्या असून, पुढील तपास प्रक्रियेत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या निकालामुळे आरोपीला दिलासा मिळाला असला तरी, या गुन्ह्यातील इतर आरोपींच्या संदर्भात पोलीस पुढील काय पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यात आरोपी तर्फे अॅड. महेश जगताप, अॅड. राहुल कसबे आणि अॅड. केदार पाटील यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅड. दिनेश देशमुख यांनी काम पाहिले.




