2 जीपसह 1100 लिटर हातभट्टी दारु जप्त ; 9 लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारु विरोधात मोहिम राबविण्यात येत असून 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा व नान्नज येथे दोन जीपमधून अकराशे लिटर हातभट्टी दारुचा साठा जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, नविन वर्षाच्या निमित्याने अवैध व बनावट दारुला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 26 डिसेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क ब 1 विभागाचे दुय्यम निरिक्षक गणेश उंडे यांच्या पथकाने रात्री 9 वाजेच्या सुमारास नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे महिंद्रा मॅक्स कंपनीची जीप क्र. MH-13- AC -1510 या वाहनातून सात रबरी ट्यूबमध्ये साठवून वाहतूक करीत असतांना 560 लिटर हातभट्टी दारु जप्त केली. वाहनाचा चालक शिवराज शिवानंद पटणे, वय 31 वर्षे, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर याचे ताब्यातून रु. 28 हजार सातशे किंमतीच्या हातभट्टी दारु व वाहनासह एकूण 4 लाख 28 हजार सातशे रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे निरिक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने रात्री 11 वाजेच्या सुमारास वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील पेट्रोल पंपाच्या समोर महिंद्रा बोलेरो कंपनीची जीप क्र. MH-12- FP -1989 या वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात सहा रबरी ट्यूबमध्ये 540 लिटर हातभट्टी दारु आढळून आली. सदर वाहनाचा चालक सूरज सीताराम पवार, वय 26 वर्षे, रा. वडजी तांडा, ता. दक्षिण सोलापूर याला अटक करुन हातभट्टी दारु व वाहनासह 4 लाख 77 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक गणेश उंडे, अंकुश आवताडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडिकट व प्रकाश सावंत यांनी पार पाडली.

आवाहन

नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाईकरिता 6 पथके नेमण्यात आली आहेत. नविन वर्षादरम्यान परराज्यातील दारुची तस्करी होऊ नये याकरीता विभागाकडून जिल्ह्याच्या सीमेवरील ठिकाणांवर गस्त घालण्यात येत असून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच या विभागाकडून ढाबा / होटेलच्या तपासण्या करण्यात येत असून ढाब्यांवर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे हे कायद्याने गुन्हा असल्याने याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कडक कारवाया करण्यात येत आहेत. ज्या होटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा होटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल– नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या