उद्घाटननाशिकपुरस्कारमहाराष्ट्र

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या पर्वातील पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.० चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या–मुख्यमंत्री

नाशिक : ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २.०पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे, तलावांतील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या कामांसाठी राज्य शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने आयोजित ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान लोकप्रतिनिधींचा महाकुंभ’, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा, अभियान २०२६-२७ चा शुभारंभ तसेच ‘सरपंच परिसंवाद – दुष्काळावर मात आणि समृद्ध गावाचा संकल्प’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यूथ फेस्टिव्हल मैदानावर आयोजित या कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि राज्यभरातील सरपंच उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामीण भागातील सामूहिक शक्तीला चालना देऊन गावांच्या विकासाला गती देणारे महत्त्वपूर्ण अभियान आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास ग्रामीण भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणता येते, हे जलयुक्त शिवार अभियानाने सिद्ध केले आहे. याच अनुभवातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अभियानात सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन करून ते म्हणाले, गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. अभियानामुळे गावांमध्ये रस्ते, स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसह अंतिम १२ ग्रामपंचायतींना स्वतः भेट देऊन तेथील विकासकामांची पाहणी करणार असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी पाण्याचे नियोजन करा

यंदा सुरुवातीला अतिवृष्टी आणि त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने दुष्काळ असलेल्या तालुक्यात १२ प्रकारच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. आगामी काळात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा. माणसे आणि जनावरांसाठी पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देऊन रब्बी हंगामासाठी योग्य नियोजन करावे. गाव तलावांमधील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे, जलसंधारणाच्या उपाययोजना राबविणे आणि जलतारा संरचना मोठ्या प्रमाणात उभारणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. या कामांसाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जी रामजी योजनेच्या माध्यमातून विविध योजनांचे अभिसरण करून जलसंधारणाची कामे हाती घेण्यात येतील. यामुळे पाणीसाठा वाढण्यासोबतच ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांनी आपले पशुधन विकू नये, यासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याचे नियोजनही शासन करणार आहे. पशुधनाचे संरक्षण करणे हे शेतीव्यवस्था टिकविण्यासाठी महत्त्वाचे असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.500

संकटाच्या काळात शासन शेतकरी व कष्टकऱ्यांच्या पाठीशी

दुष्काळी परिस्थितीत कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची काळजी शासन घेईल. पात्र शिधापत्रिकाधारकांना आवश्यक अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासह शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचविण्यात येतील. शेतकऱ्यांना मदत करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणे आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात दुष्काळ निवारण आणि दुष्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येणार आहे. तलावांतील गाळ काढणे, जलसंधारणाची कामे करणे आणि उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी अभियानाच्या गुणांकन पद्धतीतही आवश्यक बाबींचा समावेश करण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

अभियानातून ग्रामीण विकासाला चालना – मंत्री जयकुमार गोरे

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, गावे समृद्ध झाली तर विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यास मोठे पाठबळ मिळेल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ५ हजार ६४४ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला. अभियानाच्या माध्यमातून ६९ लाख १३ हजार आयुष्मान कार्ड तयार करण्यात आली. विविध योजनांच्या अभिसरणातून घरकुलांचे लाभ, दिव्यांग लाभार्थ्यांना मदत, सीसीटीव्ही यंत्रणा, रस्ते, स्वच्छतागृहे, व्यायामशाळा आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यात आली.

राज्यात २ हजार ७०६ किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून पाणंद रस्ते, सौरऊर्जेचा वापर, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली आणि ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्यावरही भर देण्यात आला. गावांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वयंपूर्ण व समृद्ध बनविण्यासाठी अभियानाचा दुसरा टप्पाही अधिक प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अभियान २०२५-२६ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. गुणानुक्रमे जिल्हा परिषद गटात नाशिक, पुणे आणि सांगली; तर पंचायत समिती गटात नाशिक, खालापूर (जि. रायगड) आणि राहाता (जि. अहिल्यानगर) या समित्यांचा प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्काराने गौरव करण्यात आला.

ग्रामपंचायतींमध्ये पुणे जिल्ह्यातील अडाचीवाडी ता. पुरंदर प्रथम, खामशेत, ता. गुहागर, जि . रत्नागिरी आणि लाडूद, ता. बागलाण, जि. नाशिक (द्वितीय विभागून), उटी बु. ता. औसा, जिल्हा लातूर, कोतवालबर्डी, जिल्हा नागपूर (तृतीय विभागून) या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची माहिती दिली. सुशासन, कार्यक्षमता, लोकसहभाग, सामाजिक सलोखा आणि पर्यावरणपूरक विकासाला प्रोत्साहन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून पंचायत प्रगती निर्देशांक उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जलतारा तज्ज्ञ प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ आणि ज्येष्ठ जलसंधारण कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अभियानाच्या पहिल्या टप्पा प्रभाविपणे राबविण्यात महत्वाच्या योगदानासाठी प्रधान सचिव एकनाथ डवले आणि यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास आमदार गोकुळ गीते, प्रा. देवयानी फरांदे, दिलीप बनकर, डाॅ राहूल आहेर, ॲड. राहूल ढिकले, हिरामण खोसकर, दिलीप बोरसे, सरोज अहिरे, नितीन पवार, विवेक कोल्हे, उपमहापौर विलास शिंदे, यशदाचे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले सरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button