ऐतिहासिक ८१४ वर्षांची परंपरा! श्रीक्षेत्र मार्डीत रविवारपासून श्री यमाईदेवी शारदीय नवरात्रोत्सव; २० ऑक्टोबरला रंगणार भव्य पालखी व यमाईदेवी-तुळजाभवानी भेट सोहळा

B1न्यूज मराठी नेटवर्क
उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मार्डी येथील श्री यमाईदेवी मंदिराचा शारदीय नवरात्रोत्सव रविवार, दिनांक ११ ऑक्टोबरपासून अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात सुरू होत आहे. तब्बल ८१४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, नवचंडी होम आणि पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी नवचंडी होम, तर मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त पालखी व सीमोल्लंघन सोहळा पार पडणार असल्याची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त व मुख्य पुजारी डॉ. रंगनाथ गुरव आणि ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली आहे.
रंगनाथ स्वामींना देवीने दिले दर्शन (ऐतिहासिक आख्यायिका)
कर्नाटक राज्यातील काळगी येथील निस्सीम देवीभक्त रंगनाथ स्वामी गोसावी (मोकाशी) यांनी माहूरगडावर तब्बल बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर बालाघाटाच्या पायथ्याशी असलेल्या, मार्कंडेय ऋषींची तपोभूमी मानल्या जाणाऱ्या मारोडी (सध्याचे मार्डी) या गावात देवीने त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले आणि मूर्तीच्या रूपात देवी येथेच स्थिरावली, अशी या देवस्थानची पुरातन आख्यायिका आहे.
नवरात्रोत्सवातील नित्य धार्मिक कार्यक्रम
नवरात्रोत्सव काळात दररोज पहाटे ४:०० वाजता महापूजा, सकाळी ९:३० वाजता नित्यपूजा व अभिषेक, तर रात्री ८:०० वाजता शेजारती असे विधिवत धार्मिक विधी पार पडणार आहेत. रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने या पवित्र नवरात्रोत्सवाला प्रारंभ होईल. या दिवशी मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, सांगोला, करमाळा आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील विविध गावांमधील शक्तीमंडळांचे कार्यकर्ते श्री यमाईदेवी मंदिरातून भक्तीभावाने ज्योत घेऊन प्रस्थान करतील.
येत्या १९ ऑक्टोबरला भव्य नवचंडी होम
सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:०० वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात नवचंडी होम होईल. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता श्री यमाईदेवी मंदिरात नवचंडी होम, अजाबळी व महापूजा होईल. सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजीच सायंकाळी ४:०० वाजता श्री यमाईदेवी मंदिरातील नवरात्रोत्सवाचा घटोत्थापन विधी पार पडेल, अशी माहिती ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांनी दिली. यंदा खंडेनवमी आणि विजयादशमी एकाच दिवशी येत असल्याने गावातील घरोघरी स्थापन केलेले घट मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी उठविण्यात येणार आहेत.
यमाईदेवी-तुळजाभवानी भेटीचा सुवर्ण सोहळा!
श्री यमाईदेवी मंदिराच्या नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व असून, सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून आणि मराठवाड्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात. नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिरात सप्तशती पाठ केले जातात. आद्य देवीभक्त रंगनाथ स्वामी मोकाशी यांचे वंशज ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी यांच्याकडे सप्तशती पाठ आणि नवचंडी होमाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:०० वाजता श्री यमाईदेवी मंदिरातून पालखी सोहळ्याला थाटात प्रारंभ होईल. गावाच्या पूर्वेला होनसळ रस्त्यावर असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या ठाण्याकडे (पावकाई मंदिर) ही पालखी मार्गस्थ होईल. सायंकाळी ६:०० वाजता यमाईदेवी आणि तुळजाभवानी या दोन्ही भगिनींच्या भेटीचा भावूक व ऐतिहासिक सोहळा आणि सीमोल्लंघन पार पडेल. या अपूर्व सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी पालखी मार्गावर सडा-रांगोळी करून रस्त्यांचे सुशोभीकरण करावे, तसेच मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. रात्री ८:०० वाजता पालखी मंदिरात परतल्यानंतर शेजारती व महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, मानकरी आणि पुजारी यांच्या सहभागातून हा पारंपरिक सोहळा साजरा केला जातो.
भाविकांना दर्शनाचे नम्र आवाहन
या ऐतिहासिक आणि पावन नवरात्रोत्सव काळात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री यमाईदेवीचे दर्शन घेऊन पुण्याचा लाभ घ्यावा, असे सहर्ष आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. रंगनाथ गुरव, ज्योतिषाचार्य रेणुकादास मोकाशी, मार्डीच्या सरपंच प्रांजली गणेश पवार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, उपसरपंच श्रीकांत मार्तंडे, देवीभक्त विठ्ठल काशीद, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, मार्डी सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब पाटील, ग्राम अधिकारी नंदकुमार पाटील, ग्राम महसूल अधिकारी दीपक कावले, ॲड. इंद्रजीत पाटील, देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवाजी गुरव, विश्वस्त पुष्पा गुरव, दत्तात्रय गुरव, पुजारी अशोक गुरव, विकास गुरव, वैभव गुरव, सुनील गुरव आणि निलेश गुरव या सर्वांनी केले आहे.




