बार्शीच्या तीव्र पाणीटंचाई विरोधात २१ नगरसेवक आक्रमक; आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, १४ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषणाचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर/बार्शी : बार्शी शहरातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, सुधारित २९६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करावी, तसेच प्रलंबित पाइपलाइनची कामे पोलीस बंदोबस्तात पूर्ण करण्यासह विविध मागण्यांसाठी बार्शी नगरपरिषदेतील विरोधी पक्षाच्या २१ नगरसेवकांच्या वतीने आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
बार्शी शहरात सध्या नागरिकांना १५ ते १७ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम असून, उजनी धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही बार्शीकरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याबाबत शिष्टमंडळाने प्रशासनाचे लक्ष वेधले.
सन १९९६ मध्ये पूर्ण झालेली बार्शी-कुर्डुवाडी संयुक्त पाणीपुरवठा योजना आता जवळपास ३० वर्षे जुनी झाली आहे. बार्शी शहरासाठी मंजूर असलेली सुधारित २९६ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कार्यान्वित करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेतील हेडवर्क, पंपिंग मशिनरी, ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, कंदर गाव ते पंपगृह पाइपलाइन आदी महत्त्वाची कामे पूर्ण झाली असली तरी काही अत्यावश्यक कामे अद्याप प्रलंबित आहेत. कुर्डुवाडी ते एमआयडीसी परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील पाइपलाइनचे काम, अकोले खुर्द ते एमआयडीसी मार्गावरील अडथळे तसेच हॉटेल वैशाली परिसरातील प्रलंबित पाइपलाइनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत पाइपलाइन टाकण्यासाठी आवश्यक शुल्क नगरपरिषदेने भरलेले असतानाही कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याबाबतही शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. संबंधित विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगरपरिषद, ठेकेदार व जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व अडथळे दूर करण्याची मागणी करण्यात आली.
टंचाई काळात टँकरची संख्या वाढविण्याची मागणी
पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत बार्शी शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी टँकरची संख्या वाढवावी, टंचाई निवारण निधीतून विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, प्रत्येक टँकरला GPS प्रणाली बसवावी, टँकरच्या फेऱ्या, पाणी भरण्याचे ठिकाण आणि वितरणाचे ठिकाण याची डिजिटल नोंद ठेवावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कंदर, कुर्डुवाडी व बार्शी येथील प्रमुख ठिकाणी Flow Meter/Water Meter बसविणे, शहरातील पाइपलाइनमधील गळती शोधण्यासाठी आधुनिक Leak Detection System, Pressure Monitoring, Acoustic Leak Detection आणि GIS आधारित डिजिटल मॅपिंग वापरणे, तसेच पाणीवाटपात पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक प्रभागाचे सार्वजनिक पाणीपुरवठा वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.
अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष उपाययोजना
पाणीपुरवठा यंत्रणेतील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, त्यामुळे पंपिंग व पाइपलाइन व्यवस्थेवर होणारा परिणाम तसेच गळतीचे वाढते प्रमाण याकडेही शिष्टमंडळाने लक्ष वेधले. कंदर, कुर्डुवाडी आणि बार्शी येथे पाणीपुरवठा यंत्रणेला अखंडित वीजपुरवठा मिळण्यासाठी विशेष उपाययोजना करून जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली.
जलदाय विभागातील रिक्त पदे भरण्याची मागणी
बार्शी नगरपरिषदेच्या जलदाय विभागातील मंजूर पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे पाणीपुरवठा व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मंजूर आकृतिबंधानुसार रिक्त पदे तातडीने भरावीत आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त तांत्रिक कर्मचारी व अभियंते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करावे, जुन्या व नवीन पाइपलाइन, पंपिंग मशिनरी, दाब, गळती, वाल्व्ह ऑपरेशन आणि वितरण व्यवस्थेची तपासणी करावी, तसेच २९६ कोटी रुपयांच्या योजनेचा मासिक प्रगती अहवाल जिल्हाधिकारी स्तरावर सार्वजनिक करावा, अशी मागणी करण्यात आली.
१४ ऑक्टोबरपासून लाक्षणिक उपोषणाचा इशारा
या सर्व मागण्यांबाबत प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्यास दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ पासून जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून तहसीलदार, बार्शी यांच्या कार्यालयासमोर २१ नगरसेवकांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून बार्शीच्या पाणीप्रश्नी लवकरात लवकर बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. प्रशासनाकडून या प्रश्नावर तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, कृष्णराज बारबोले, नवनाथ माळगे, अनिकेत कारंडे, अमोल मांगडे, महेडमिया लांडगे, सचिन मांगडे, मुजमिल पठाण, बबलू साळुंखे, अजय भानवसे, प्रशांत जाधव, आर्यन पाचपुते, बबन नायकोजी, मनीष चौहान, सतीश पाचकूडवे, बप्पा सुतार, नरेंद्र नलावडे तसेच इतर नगरसेवक उपस्थित होते.
बार्शीकरांच्या जीवनाशी निगडित असलेल्या पाणीप्रश्नाकडे केवळ नगरपरिषदेचा विषय म्हणून न पाहता जिल्हास्तरीय अत्यावश्यक प्रश्न म्हणून प्रशासनाने गांभीर्याने पाहावे आणि २९६ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून बार्शीकरांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका शिष्टमंडळाने मांडली.




