बार्शीत किसान सभेचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्याची जोरदार मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज, २१ सप्टेंबर २०२६ रोजी बार्शी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. बार्शी तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीचे सावट या मोर्च्यामध्ये तीव्रतेने दिसून आले. कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्च्यात तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तालुक्यातील पिकांची झालेली राखरांगोळी आणि पाण्याची तीव्र टंचाई यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांच्या घोषणांनी तहसील कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्याचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या कल्याणाचा जो आदर्श घालून दिला आहे, तो आजचे सरकार पूर्णपणे विसरले आहे. शेतकरी संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून पिके जळून खाक झाली आहेत; परंतु सरकार मात्र दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. शेतकरी आता शांत बसणार नसून सरकारची गुर्मी उतरवून दुष्काळ पदरात पाडून घेतील.”
मोर्च्यातील प्रमुख मागण्या:
संपूर्ण बार्शी तालुका तत्काळ ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करून प्रतिहेक्टरी ५०,००० रुपये भरपाई द्यावी.
सन २०२५ चा थकीत पीक विमा तत्काळ देण्यात यावा.
तालुक्यात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी अनुदानाची सोय करावी.
रोजगार हमी योजनेअंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध करून द्यावे.
भ्रष्टाचारमुक्त रेशनिंग व्यवस्था मजबूत करून सरसकट कर्जमाफी लागू करावी.
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे.
विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची फी माफ करावी आणि शेतीसाठी विनाअडथळा दिवसा वीज पुरवठा करावा.
खरीप हंगामातील पीक नुकसानीची भरपाई देऊन आगामी रब्बी हंगामासाठी सवलतीच्या दरात बी-बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत.
वाढती महागाई रोखून सर्व शेतमालाची एमएसपी (न्यूनतम आधारभूत किंमत) दराने खरेदी करावी.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना २५ लाख रुपयांची मदत जाहीर करावी.
या आंदोलनात लहू आगलावे, ए. बी. कुलकर्णी, राहुल भड, विलास बारबोले, मनोज मोरे, घोडके मामा, प्रविण मस्तुद, हरी पवार, प्रा. सतीश पाटील, मनोज डुरे पाटील, निर्मला सरवदे, पांडुरंग यादव, मुबारक मुलानी, दत्ता कदम, भारत भोसले, भरत चव्हाण, किसन मुळे, आनंद गुरव, प्रमोद मंडलीक, दत्तात्रय नेहरकर, रशिद इनामदार, कैलास माने यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



