परिसरातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच उत्तम आरोग्य सुविधा मिळणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तळेगाव येथील 300 खाटांचे रुग्णालय व आष्टी उपसा सिंचन प्रकल्पाचे भूमीपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा : तळेगाव येथे होत असलेल्या अत्याधुनिक 300 खाटांच्या रुग्णालयामुळे आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना आता स्थानिक स्तरावरच चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील. सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने रुग्णालय मंजूर झाले. रुग्णालयासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याचे काम शासन करणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
तळेगाव (शामजीपंत) येथे नव्याने बांधण्यात येत असलेले 300 खाटांचे रुग्णालय तसेच उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी श्री.बावनकुळे बोलत होते. यावेळी आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी खासदार रामदास तडस, सुरेश वाघमारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, माजी जिप अध्यक्ष सरिता गाखरे, महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे, संजय गाते, सुधीर दिवे आदी उपस्थित होते.
बावनकुळे यांच्याहस्ते प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेवर कुदळ मारून तर आष्टी उपसा सिंचन योजनेचे ई-भूमिपूजन करण्यात आले. आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील नागरिकांना वर्धा किंवा नागपूर येथे जाऊन उपचार करावे लागत होते. तळेगाव येथे रुग्णालय उभे राहिल्यानंतर येथेच चांगल्या दर्जाच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होईल. आष्टी तालुक्यातील काही गावातील नागरिकांना सिंचनासाठी पाण्याची अडचण होती. आष्टी उपसा सिंचन प्रकल्पामुळे या गावांना बारमाही पाणी मिळणार असल्याचे आ.सुमित वानखेडे म्हणाले.
300 खाटांच्या रुग्णालयातील सुविधा आष्टी तालुक्यातील तळेगाव येथे आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने येथे 300 खाटांचे रुग्णालय मंजूर झाले आहे. हे रुग्णालय जवळपास 30,099 चौरस मीटर क्षेत्रफळात 155 कोटी 84 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. यामध्ये रुग्णालय व प्रशासकीय इमारत, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान असणार आहे. रुग्णालयामध्ये पाणी पुरवठा, पावसाचे पाणी संकलन व्यवस्था, वातानुकुलीत लिफ्ट, सीसीटीव्ही, शवागार, सुरक्षा कक्ष, पंपगृह, विद्युत उपकेंद्र, ऑक्सिजन शेड, वैद्यकीय गॅस पाईपलाईन, चार अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, लिक्विड ऑक्सिजन टँक, पार्किग सुविधा, अंतर्गत रस्ते इत्यादी राहणार आहे.
या तीन मजली रुग्णालयामध्ये नोंदणी विभाग, बाह्यरुग्ण विभाग, माता व बाल आरोग्य विभाग, आपत्कालीन विभाग, रेडिओलॉजी, सीटीस्कॅन, सोनोग्राफी, औषध वितरण विभाग, महिला व पुरुष स्वतंत्र वार्ड, बर्न वार्ड, अतिदक्षता वार्ड, महिला संसर्गजन्यरोग वार्ड, रक्तपेढी, निर्जंतुकीकरण विभाग आदी सुविधा राहणार आहे. रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक स्तरावरच उपलब्ध होईल.
आष्टी उपसा सिंचन योजना, १४ गावांना लाभ मोर्शी येथील उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत आष्टी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही योजना उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर साखळी क्रमांक 18300 मीटरवर स्थित आहे. या योजनेमध्ये 2 पंपगृह उभारण्यात येणार आहे. पंपगृह दोनच्या वितरण कुंडावरून आष्टी येथील 155 हेक्टर क्षेत्र व थार, किन्ही, करोला, चामला, बोरखेडी, नागझिरी, बांबर्डा, बोटोणा, वाघोडा, वाडी, पळसोना, सारवाडी, तरोडा या गावातील 1 हजार 903 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे या गावातील शेतीचा सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे. शेतकऱ्यांना बारामाही सिंचन उपलब्ध होणार असल्याने जनावरांच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.




