गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचावा जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांनी Bappa.org वर छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सातारा, दि. १६ : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्याबरोबरच त्याचा युनेस्कोच्या वारसा दर्जासाठी दावा करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाची कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सहभाग डिजिटल माध्यमातून जतन करून जगभर पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
गणेशोत्सवाशी निगडित स्थानिक कला, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सहभाग यांचे डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी Bappa.org हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गणेशोत्सवाची छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती देश-विदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासाठी स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचे चांगल्या दर्जाचे छायाचित्र तसेच गणेशोत्सवाची माहिती देणारा दोन ते चार ओळींचा मजकूर Bappa.org या मंचावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, गणेश मंडळे आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन Bappa.org या डिजिटल व्यासपीठावर छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करावेत. तसेच या उपक्रमाची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली आहे.




