कॉपर वायर चोरीप्रकरणी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; तिघे अटकेत, ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल व बोलेरो पिकअप जप्त; चौथा आरोपी फरार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील परांडा चौक परिसरातील वाईंडिंग वर्कशॉपच्या गोदामातून लाखो रुपयांची कॉपर वायर चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा बार्शी शहर पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून, चोरीस गेलेली कॉपर वायर, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पिकअप तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले साहित्य असा एकूण ६ लाख ९७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी फरार असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
बार्शी शहरातील परांडा चौक येथे पप्पू श्रीमंत रगडे (वय ३५, रा. उपळाई ठें., ता. बार्शी) यांचे वाईंडिंग वर्कशॉपचे गोदाम आहे. दि. १२ मे ते १३ जून २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर १ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे, २०४ किलो वजनाचे कॉपर वायरचे पाच बंडल चोरून नेले होते.
याप्रकरणी रगडे यांच्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३६३/२०२६, बीएनएस कलम ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे गतिमान केली. तपासादरम्यान कोल्हापूर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांचा या चोरीशी संबंध असल्याचे समोर आल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सागर आकाराम गोसावी (४७, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), हनुमंत राजाराम सपोनीसी (४०, रा. त्रिवेळी मंदिर, टेंबलाई नाका, कोल्हापूर) आणि दुर्गाप्पा रामाप्पा कल्याणी (४८, रा. त्रिवेळी मंदिर, टेंबलाई नाका, कोल्हापूर) यांचा समावेश आहे. या गुन्ह्यातील मंजूनाथ, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर हा चौथा आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान १ लाख ९३ हजार ६०० रुपये किमतीचे कॉपर वायरचे पाच बंडल, ४ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप (एमएच १० बीआर १४११) तसेच वायर कापण्यासाठी वापरण्यात येणारे कटर व इतर साहित्य असा सुमारे ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, पुढील तपासासाठी व फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने बार्शीसह अन्य जिल्ह्यांत अथवा राज्यांत अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.





