गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिका

0

प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड, दि. ४ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह विविध भागांतून कोकणात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि विनाअडथळा व्हावा, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रवाशांची गैरसोय, लूटमार, अवाजवी भाडे आकारणी तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक व मालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत देण्यात आला आहे.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने प्रवासी रेल्वे स्थानक, बसस्थानके तसेच प्रमुख वाहतूक केंद्रांवर दाखल होणार असल्याने रिक्षा व प्रवासी बस वाहतूकदारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. रिक्षा चालकांनी वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध ठेवणे बंधनकारक असून, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या थांब्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशा शिस्तबद्ध पद्धतीने रिक्षा उभ्या कराव्यात.
प्रवाशांकडून शासनाने अथवा परिवहन विभागाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अवाजवी भाडे आकारू नये, तसेच प्रवाशांशी उद्धटपणे वर्तन करू नये. रिक्षाची प्रवासी क्षमता लक्षात घेऊनच प्रवाशांची वाहतूक करावी. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करून प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

खासगी तसेच प्रवासी बस चालक आणि मालकांनीही गणेशोत्सवाच्या काळात विशेष दक्षता घ्यावी. बसमधील आपत्कालीन खिडकी किंवा दरवाजा, अग्निशामक यंत्रणा आणि प्रथमोपचार पेटी सुस्थितीत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक आहे. चालकाने मद्यपान करून किंवा धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये. अशा प्रकारचे नियमभंग आढळल्यास संबंधित चालकासह बस मालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.500गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवासी बसच्या फेऱ्या आणि सुटण्याच्या वेळांचे योग्य नियोजन करावे. परिवहन विभागाने निश्चित केलेल्या भाडेदरांपेक्षा अधिक भाडे प्रवाशांकडून आकारू नये. प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन जादा भाडे आकारणाऱ्या वाहतूकदारांवरही कारवाई केली जाणार आहे.

तक्रारीसाठी परिवहन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
रिक्षा किंवा बस वाहतूकदारांकडून जादा भाडे आकारले जात असल्यास, प्रवाशांशी गैरवर्तन होत असल्यास अथवा वाहतूक नियमांचे उल्लंघन आढळल्यास प्रवाशांनी संबंधित वाहनाचा क्रमांक, प्रवासाचा मार्ग व तक्रारीचा तपशील नमूद करून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलच्या अधिकृत ई-मेलवर rto.46-mh@gov.in तक्रार नोंदवावी.

गणेशोत्सवाच्या काळात सर्व वाहतूकदारांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोकणात येणाऱ्या चाकरमानी भाविकांनीही सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची अडचण अथवा गैरप्रकार आढळल्यास परिवहन विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्यामार्फत करण्यात आले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या