देहविक्री करणाऱ्या महिला व कलावंतांना विधी सेवा व शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
परभणी, दि. ०४ : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने गुरुवारी (दि.३)परभणी येथे विधीविषयक सेवांबद्दल जनजागृती तसेच देहविक्री करणाऱ्या महिला व कलावंतांच्या विविध अडीअडचणी जाणून घेण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. सादराणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये सचिव (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण) भूषण म. काळे यांनी उपस्थित महिला व कलावंतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत विधी सेवा, कायदेशीर सल्ला व सहाय्य तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी देहविक्री करणाऱ्या महिलांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, कौटुंबिक व कायदेशीर अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातील विविध समस्या मांडल्या. विशेषतः त्यांच्या मुलांना आधारकार्ड तसेच रेशनकार्ड मिळविताना येणाऱ्या अडचणींचा प्रश्न महिलांनी उपस्थित केला.
तसेच, कलावंतांना भेडसावणाऱ्या विविध अडीअडचणी व शासनामार्फत मिळणाऱ्या मानधनासंदर्भातील प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. पात्र कलावंतांना शासनामार्फत मिळणारे मानधन मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही व मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सुभाष मस्के, प्रकल्प अधिकारी, महानगरपालिका यांनी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या बचत गटाशी संबंधित विविध योजना, महिला बचत गटांना उपलब्ध असलेल्या सुविधा व योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.
महिलांनी व कलावंतांनी मांडलेल्या विविध समस्या व अडचणींची नोंद घेण्यात आली. त्यांच्या समस्यांवर उपलब्ध असलेल्या कायदेशीर उपाययोजना व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
समाजातील वंचित, दुर्बल व गरजू घटकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची जाणीव करून देणे, मोफत विधी सेवा उपलब्ध करून देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.





