रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन व मेट्रोच्या कामांना कालबद्ध गती द्या – उपमुख्यमंत्री सुनेत्राअजितपवार
उपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावा, हिंजवडीच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विशेष ‘टास्क फोर्स’
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यासह विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आणि हिंजवडी ‘ माण ‘ मारुंजी परिसरातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या बाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड, विविध विभागांचे अधिकारी, स्थानिक नागरिक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंजवडी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील आणि राज्याच्या उत्पन्नातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आता ठोस आणि तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. हिंजवडी परिसरात पीएमआरडीए, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड महापालिका, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण तसेच ग्रामपंचायती अशा अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे चाकणच्या धर्तीवर हिंजवडीसाठी विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच हिंजवडी परिसराच्या विकासासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित दादा कायम आग्रही असत. याबाबत त्यांनी या परिसरचा पाहणी दौरा व विकास कामाचा आढावा घेत प्रश्न सोडविले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची जलदगतीने अंमलबजावणी करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना तातडीने बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
संबंधित विभागांनी आपल्या कामाची ‘ब्लूप्रिंट’ तयार करून तातडीने कार्यवाही सुरू करावी. रस्ते, मेट्रो, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणी आणि वीजपुरवठा या प्रश्नांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांची दर आठवड्याला समन्वय बैठक घेण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी पोलीस मनुष्यबळ वाढविणे, सीसीटीव्ही बसविणे तसेच आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजनांची गतीने अमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रशासनासोबत नागरिक आणि स्थानिक कंपन्यांनीही आपली जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करावे. हिंजवडीच्या सर्वांगीण विकासासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर सहकार्याने आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.





