बार्शीत आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरू होण्याचा मार्ग मोकळा; अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले कार्यवाहीचे आदेश
B1 न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपकेंद्र सुरू करण्याच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. विधान परिषद सदस्य आ. राजेंद्र राऊत यांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील यांच्याकडे बार्शी येथे उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आ. राजेंद्र राऊत यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी महामंडळाकडे पत्र पाठवून बार्शी, माढा आणि करमाळा तालुक्यातील लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने बार्शी येथे जिल्हास्तरीय उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. बार्शी हे या भागातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे हजारो युवक-युवती आणि लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मोठी सोय होणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
या मागणीवर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी तातडीने सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानंतर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश गर्वखांब यांनीही पत्राद्वारे आ. राजेंद्र राऊत यांना कळविले की, बार्शी येथे उपकेंद्र सुरू करण्याबाबतची बाब अध्यक्षांनी विचारात घेतली असून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्यांना मोठा दिलासा
बार्शी येथे उपकेंद्र सुरू झाल्यास बार्शी, माढा, करमाळा तसेच परिसरातील लाभार्थ्यांना मुंबई किंवा इतर जिल्हा कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याची गरज भासणार नाही. कर्ज, स्वयंरोजगार, उद्योजकता आणि महामंडळाच्या विविध योजनांशी संबंधित कामे स्थानिक स्तरावरच होऊ शकणार असल्याने युवकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बार्शी परिसरातील लाभार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून उपकेंद्र लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी अपेक्षा नागरिक आणि लाभार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.





