राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात क्रीडा विषयाचा समावेश काळाची गरज – डॉ. अनिल राव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठांनी केवळ पारंपरिक शिक्षणावर भर न देता, विविध अभ्यासक्रमांमध्ये ’क्रीडा’ या विषयाचा मुख्य घटक म्हणून समावेश करावा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मैदानी खेळांशी जोडले जातील, असे प्रतिपादन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 कार्यगट, महाराष्ट्र राज्याच्या सुकाणू समितीचे सदस्य डॉ. अनिल राव यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित या विशेष सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर उपस्थित होते.
यावेळी उत्कृष्ट क्रीड शारीरिक शिक्षण संचालक डॉ. मल्लिकार्जुन पाटील, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक संतोष खेंडे, उत्कृष्ट क्रीडा शिक्षक राहुल हजारे तर उत्कृष्ट क्रीडा पत्रकारीता विरेश अंगडी यांना तर विविध स्थरावर विविध क्रीडा प्रकारात यश संपादक केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यापीठातील विविध स्पर्धेत विद्यापीठातील महिला महोत्सव, विद्यापीठातील कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. अनिल राव म्हणाले, शारीरिक सुदृढता आणि मानसिक आरोग्य या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने पुढाकार घेऊन क्रीडा विषयाचा सर्व विद्याशाखांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात अनिवार्य किंवा श्रेयांक आधारित विषय म्हणून समावेश केला पाहिजे. यामुळे विद्यार्थ्यांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि केवळ मोजकेच नव्हे, तर सर्वच विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या खेळाशी जोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अभ्यासाच्या ताणातून मुक्त होण्यासाठी आणि नेतृत्वगुण, संघभावना, निर्णयक्षमता यांसारखी जीवनकौशल्ये आत्मसात करण्यासाठी मैदान हे सर्वात मोठे विद्यापीठ असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भारतीय विश्वविद्यालय संघाचे सचिव डॉ. सिंकु कुमार सिंग यांनी आजच्या तरुण पिढीला अत्यंत मार्मिक सल्ला दिला. वाढत्या डिजिटल युगात तरुणाई मैदानापासून दुरावत चालली आहे, यावर चिंता व्यक्त करत ते म्हणाले, आजचा तरुण तासन्तास मोबाईल स्क्रीनसमोर बसून आभासी गेम खेळण्यात आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे. यामुळे शारीरिक आरोग्याच्या तक्रारी तर वाढत आहेतच, शिवाय मानसिक ताणतणावही वाढत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलवरील गेम्सच्या आहारी न जाता, खर्या अर्थाने मैदानावर उतरून घाम गाळला पाहिजे. डॉ. सिंग पुढे म्हणाले, क्रीडा क्षेत्र म्हणजे आता केवळ हौस राहिलेली नाही. यात करिअरच्या प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उत्तम खेळाडूंना सरकारी नोकर्यांमध्ये क्रीडा कोट्यातून स्थान मिळत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कर्नल प्रकाश महानवर म्हणाले, विद्यापीठ नेहमीच दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यात क्रीडा पायाभूत सुविधा अधिक अद्ययावत करण्यावर आमचा भर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे प्र. कुलसचिव तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वर्षभरात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मिळवलेल्या घवघवीत यशाचा आलेख मांडला. तसेच या पारितोषिक वितरण सोहळ्यामागील भूमिका स्पष्ट केली.
या भव्य सोहळ्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह विद्यापीठाच्या अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषद सदस्य, विविध महाविद्यालयाचे क्रीडा संचालक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांचा परिचय सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी करून दिला. उपस्थितांचे आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांनी मानलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे आणि श्रुती देवळे यांनी केले.





