बार्शी तालुका पोलिसांचा बाभुळगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा; १३ आरोपींवर गुन्हे, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ३ ऑगस्ट : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर सुरू असलेल्या धडक मोहिमेअंतर्गत बाभुळगाव येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी छापा टाकून १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण २ लाख ३२ हजार ९३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, बाभुळगाव येथे काही इसम क्लब पत्त्यांवर जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ पोलीस स्टाफसह संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात जुगार खेळताना १३ जण आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, पत्ते व अन्य साहित्य असा २,३२,९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २४२/२६ नुसार महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : चांगदेव मुकुंद लोंढे, धनंजय भगवान शिंदे, निलेश गजेंद्र शिंदे, किशोर विक्रम शिंदे, गोरखनाथ एजिनाथ शिंदे, सिद्धेश्वर चंद्रा शिंदे, गणेश मिटू नवले, विजय हरिदास अडसूळ, चंद्रकांत दशरथ झिने, लक्ष्मण पांडुरंग झिने, भरत पंढरीनाथ शिंदे, विजय विठ्ठल शिंदे आणि पांडुरंग श्रीधर उघले. सर्व आरोपी हे रा. बाभुळगाव, ता. बार्शी येथील आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे तसेच पोलीस कर्मचारी राजेंद्र मंगरुळे, अरुण डुकळे, सागर वाकळे, शशिकांत लोकरे, महेश माने आणि शिवशंकर खराडे यांनी सहभाग घेतला. अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे बार्शी तालुका पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




