आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते पवनार ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे लोकार्पण
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.1 : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार येथे नव्याने बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायतीचे लोकार्पण व आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश मोकलकर, संजय गांधी निराधार समिती ग्रामीणचे अध्यक्ष आशिष कुचेवार, उपसरंपच राहुल पाटनकर, अजय गांडोळे आदी उपस्थित होते.
आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पवनारच्या विकासासाठी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची मोठी भूमिका राहिली असून सेवाग्राम विकास आराखड्यातून जास्तीत विकासाची कामे त्यांच्या प्रयत्नांने झाली आहे. नवीन इमारतीतून ग्रामपंचायतीच्या कर्मचा-यांना सर्वसामान्य नागरिकांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी ऊर्जा मिळेल, असे आ. राजेश बकाने म्हणाले. ग्रामीण भागातील विकासाची कामे करीत असतांना विकसित भारत रोजगार हमी योजनांच्या निधीमधूनम करण्यात यावी, अशी सुचना त्यांनी ग्रामपंचायतीला केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय गांडोळे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन उप अभियंता महेश मोकलकर यांनी केले. कार्यक्रमाला पवनार येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





