गोठ्यात लपवलेला २० लाखांचा गांजा जप्त; मोहोळमध्ये धडक कारवाई, आरोपी अटकेत
B1न्यूज मराठी नेटवर्क
मोहोळ : पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेदरम्यान सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मोहोळ तालुक्यातील एका शेतातील गोठ्यात लपवून ठेवलेला ४० किलो ३८५ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत ₹२० लाख १९ हजार २५० किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ व अवैध दारूविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. बुधवारी (१६ जुलै) सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील यांचे पथक मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार विजयकुमार भरले यांना गोपनीय माहिती मिळाली की, भैरवनाथ भोसले (रा. अंकोली, ता. मोहोळ) याने आपल्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात गांजा लपवून ठेवला आहे.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला. गोठ्यातील दोन प्लास्टिकच्या पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये उग्र वास असलेला, ओलसर हिरव्या रंगाचा, पाने, बिया व बोंडे असलेला ४० किलो ३८५ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी भैरवनाथ भोसले याला अटक केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९९/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.





