नेट-सेट-गेटनंतर आणखी एक शैक्षणिक शिखर : प्रा. डॉ. राहुल पालके यांना एम.ए. हिंदीत ए+ श्रेणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. १६ : श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. राहुल भगवान पालके यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम.ए. हिंदी (NEP-2024) पदव्युत्तर परीक्षेत ए+ श्रेणी (CGPA 8.25) मिळवत आणखी एक उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन केले आहे.
ज्ञानाच्या विविध शाखांचा सातत्याने अभ्यास करत आंतरशाखीय दृष्टिकोन जोपासणारे प्रा. डॉ. पालके यांनी जून २०२६ मध्ये झालेल्या या परीक्षेत ७७.१४ टक्के गुण मिळवून ए+ श्रेणी प्राप्त केली. यापूर्वी त्यांनी विविध विषयांतील नेट, सेट आणि गेट परीक्षा मिळून तब्बल २१ वेळा उत्तीर्ण होण्याची उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यानंतर हिंदी विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून साहित्याविषयीची आपली आवड आणि बहुविषयक अध्ययनाची बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
अध्यापन, संशोधन, लेखन आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसोबतच विविध भारतीय भाषा व साहित्याचा सातत्याने अभ्यास करणे, हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा अविभाज्य भाग राहिला आहे.
साहित्याची आवड, आंतरशाखीय अध्ययन आणि आजीवन शिक्षणाची भूमिका यांचा समन्वय साधत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर ज्ञानाच्या व्यापक दृष्टीकोनाचा आदर्श निर्माण केला आहे. प्रा. डॉ. राहुल पालके यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी तसेच हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





