पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; तीन चोरीचे गुन्हे उघडकीस, ९.३० लाखांचा १०० टक्के मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : पंढरपूर शहर पोलिसांनी घरफोडी व गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींविरुद्ध मोठी कारवाई करत तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या कारवाईत एकूण ६७.४९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, सुमारे ९ लाख ३० हजार रुपये किमतीचा १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीनही गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहिल्या प्रकरणात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३११/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे (रा. शिक्षक कॉलनी, माळशिरस) या १७ एप्रिल २०२६ रोजी माळशिरस-पंढरपूर बसने प्रवास करत असताना पंढरपूर बसस्थानकात त्यांच्या गळ्यातील २८ ग्रॅम वजनाचे सुमारे ३.४५ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले होते.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी शहरातील ३६ ते ४० सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून प्रिया रवींद्र काळे (रा. राजापूर, ता. मंगळवेढा) व संदीप युवराज मोरे (रा. विजापूर रोड, सोलापूर) यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८४/२०२६ मध्ये फिर्यादी मुकुंद संजय चव्हाण (रा. सुस्ते, ता. पंढरपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ३ मे २०२६ रोजी श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी येथे लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेत नवरीकडील बॅगेतील ३६.४९९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (मंगळसूत्र, मिनी गंठण व चोकर्स) सुमारे ५.४० लाख रुपये किमतीचे चोरीस गेले होते.
या गुन्ह्याच्या तपासात ६५ ते ७० सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, एसडीआर व मोबाईल टॉवर विश्लेषणाच्या आधारे संदीप युवराज मोरे याला अटक करून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
तिसऱ्या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३२/२०२६ मध्ये फिर्यादी स्वाती भारत डुकरे (रा. आंबी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे, ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र २७ जून २०२६ रोजी पंढरपूर बसस्थानकावर चोरीस गेले होते.
या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत पोलिसांनी ४० ते ४५ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चांदणी हिरू भोसले (रा. माळवाडी, वडगाव गुप्ता, जि. अहिल्यानगर) हिला अटक केली. तिच्याकडूनही चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये एकूण ६७.४९९ ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे ९.३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या नेतृत्वाखालील डीबी पथक व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तसेच सोलापूर ग्रामीण सायबर शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.




