‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी, तूरही टोकण पद्धतीने लावली

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव,दि.३ जुलै : बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज प्रत्यक्ष शेतात उतरून दिला.धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील प्रगतिशील शेतकरी किरण तीर्थकर यांच्या शेतात श्री.पुजार यांनी स्वतः बीबीएफ पेरणी यंत्र चालवत सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक केले,तर टोकण पद्धतीने तूर लागवड करून आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेतीची दिशा शेतकऱ्यांसमोर उभी केली.
खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रात्यक्षिकाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत,”जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असल्याने वेळेत पेरणी पूर्ण करा,मात्र पारंपरिक सपाट पद्धतीऐवजी बीबीएफ पद्धतीचाच अवलंब करा,असे आवाहन केले.
पुजार यावेळी म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात बहुतांश भागात पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाला आहे.मात्र हवामानातील वाढती अनिश्चितता, एल निनोचा संभाव्य परिणाम, अल्पावधीत होणारा मुसळधार पाऊस आणि पावसातील खंड या परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणीची पद्धत बदलणे ही काळाची गरज आहे.बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा तात्काळ निचरा होतो,तर पावसाचा खंड पडल्यास सरींमध्ये ओलावा अधिक काळ टिकून राहतो. त्यामुळे मुळांना पुरेसा प्राणवायू मिळतो,मुळांची वाढ चांगली होते, अन्नद्रव्यांचे शोषण प्रभावी होते, मुळकूज व पिवळेपणाचा धोका कमी होतो आणि पीक अधिक जोमाने वाढते.हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापन, ओलावा संवर्धन आणि उत्पादनवाढीसाठी बीबीएफ पद्धत अत्यंत प्रभावी आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी टोकण पद्धतीने तूर पेरणीचेही प्रात्यक्षिक केले.योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर बियाणे पडत असल्याने अपेक्षित रोपसंख्या मिळते, बियाण्यांची बचत होते, आंतरमशागत सुलभ होते तसेच उपलब्ध पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाशाचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनवाढीस मदत होते,असे त्यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने शक्यतो आपल्या शेतात रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीनेच पेरणी करावी. हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करून अधिक सुरक्षित,शाश्वत आणि फायदेशीर शेतीसाठी हीच पद्धत सर्वाधिक उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना प्रत्येक गावात बीबीएफ पद्धतीचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार अधिकाधिक क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी व्हावी,यासाठी विशेष मोहीम राबवावी,शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे, पेरणी यंत्रांची उपलब्धता करून द्यावी,प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे आणि पेरणीपासून पीक व्यवस्थापनापर्यंत सातत्याने तांत्रिक मदत द्यावी,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.कृषी विभागाने हे अभियान लोकचळवळीच्या स्वरूपात राबवावे,असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात जिजाऊ महिला शेतकरी गटाच्या महिलांनी रासायनिक पद्धतीने सोयाबीन बियाण्यांच्या बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले.तसेच कामगंध सापळ्याचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. दूध उत्पादक महिला शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते संकरित मका बियाण्यांचे चारा पिकासाठी वाटप करण्यात आले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जिल्हाधिकाऱ्यांनी आंब्याचे रोपटे लावले.
कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर,तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाने,सरपंच भगीरथ लोमटे, मंडळ कृषी अधिकारी सोनाली गादेकर,उप कृषी अधिकारी वैभव लेणेकर, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी,क्षेत्रीय कर्मचारी,ग्रामस्थ आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
बीबीएफ प्रात्यक्षिकासाठी जिजाऊ सेंद्रिय गटाचे सुरज जाधव,बालाजी धुमाळ,हनुमंत लोमटे,जगन भोसले, भीमराव भोसले,सोपान निंबाळकर, कृष्णा बिराजदार,राहुल भोईटेआशा धुमाळ,पल्लवी जाधव, मंगला वडवले, दीपा बिराजदार, मनीषा लोमटे, रतन पवार, वैशाली माळी, ताराबाई शिंदे तसेच गौडगाव येथील पाणी फाउंडेशनच्या महिला शेतकरी अर्चना भोसले,सिंधू भोसले,पार्वती भोसले,शिलावती भोसले,वर्षा भोसले,विमल माळी,शारदा भोसले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
प्रात्यक्षिकानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत,बदलत्या हवामानात अधिक सुरक्षित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.जिल्हाधिकाऱ्यांनीही “हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित, शाश्वत आणि अधिक उत्पादनक्षम शेतीसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धत हा सर्वोत्तम पर्याय आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आपली शेती अधिक सक्षम आणि फायदेशीर करावी,असे आवाहन केले.




