बार्शीत अवैध देशी – विदेशी दारू विक्रीवर “एसपीं” च्या पथकाचा मोठा छापा, ड्रॅगन चायनीज सेंटर व गणेश पान शॉपमधून २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
बार्शीतील अवैद्य धंद्यांवर पुन्हा एकदा बाहेरील पथकाकडून कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील आगळगांव रोड, रिंग रोड परिसरातील एमएसईबी कार्यालयासमोर असलेल्या ड्रॅगन चायनीज सेंटर व शेजारील गणेश पान शॉप येथे अवैधरीत्या देशी-विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून तब्बल २ लाख ३० हजार २१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सचिन भारत देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकास गोपनीय बातमीदारामार्फत अवैध दारू विक्रीची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पंचांना सोबत घेऊन पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान अभय दीपक सरकाळे, दीपक एकनाथ सरकाळे, रिझवान अश्रफ दार, आनंद महादेव बोराडे आणि प्रसाद सुरेश पवार हे अवैधरीत्या देशी-विदेशी मद्याची विक्री करताना आढळून आले. चौकशीअंती त्यांच्याकडे दारू विक्री अथवा साठवणुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी घटनास्थळी झडती घेतली असता विविध ब्रँडच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्या, बिअर कॅन, मद्य साठवण्यासाठी वापरण्यात आलेला फ्रिज तसेच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ३० हजार २१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये टँगो पंच, देशी संत्रा, ढोकी संत्रा, बडवायझर, किंगफिशर, कासबर्ग, ट्युबोर्ग आणि हायवर्ड यांसारख्या विविध ब्रँडच्या मद्याचा समावेश आहे.
पुरवठादार वाईन शॉप मालकावरही गुन्हा दाखल आरोपींनी हा मद्यसाठा तळेवाडी येथील चंद्रकांत ऊर्फ आप्पा पिसे यांच्या वाईन शॉपमधून घेतल्याचे पोलिस तपासात सांगितले. संबंधित वाईन शॉपधारकाकडे किरकोळ स्वरूपात मद्यविक्रीचा परवाना असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी मद्य पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी अभय सरकाळे, दीपक सरकाळे, रिझवान दार, आनंद बोराडे, प्रसाद पवार तसेच चंद्रकांत ऊर्फ आप्पा पिसे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), ६५ (ई), ८३, ९० व १०८ अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार साठे करत आहेत.




