मुलींनो, निर्भय होऊन जीवन जगायला शिका : निर्भया पथक प्रमुख बाबासाहेब घाडगे

मळेगाव येथील मित्र विद्यालयात निर्भया पथकांचे मार्गदर्शन शिबीर संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महिला व तरुणींनी आपल्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहून कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने जीवन जगावे, असे आवाहन निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी केले. येथील मित्र विद्यालयात विद्यार्थिनींसाठी आयोजित विशेष मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विलास मिरगणे होते.
यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना घाडगे यांनी ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक समजून घेण्याचे महत्त्व सांगितले. तसेच सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी, वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर करू नये आणि कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीचा सामना झाल्यास त्वरित पालक व निर्भया पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमात पोलीस हवालदार उज्वला निंबाळकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. त्यांनी कायदेशीर हक्क, स्वसंरक्षण आणि मानसिक बळकटी याविषयी मार्गदर्शन करत समुपदेशन केले.
या कार्यक्रमास नम्रता गटकुळ, हनुमंत पाडुळे, भाऊसाहेब महानवर, हेमांगी सांगडे, गुलाब शेख, विकास ढेंगळे, शंकर आगलावे, राजेंद्र बागुल यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर आगलावे यांनी केले. अत्यंत खेळीमेळीच्या आणि संवेदनशील वातावरणात हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




