क्राईमबार्शीमहाराष्ट्र

कोयत्याच्या सहाय्याने दहशत माजवणारा सराईत गावगुंड जेरबंद! बार्शी तालुका पोलिसांची धडक कारवाई!

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शी शहर आणि तालुका परिसरात आपल्या गुंडप्रवृत्तीने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गावगुंडाला जेरबंद करण्यात बार्शी तालुका पोलिसांना मोठे यश आले आहे. संजय विलास आरगडे (रा. तावडी, ता. बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्यासह त्याच्या इतर साथीदारांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
​
​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय आरगडे हा बार्शी परिसरात सर्वसामान्य लोकांच्या जमिनी व जागा बेकायदेशीरपणे बळकावणे, गोरगरीब शेतकरी आणि स्थानिक व्यवसायिकांना किरकोळ कारणांवरून बेदम मारहाण करून दहशत निर्माण करणे यांसारखी कृत्ये करत होता. इतकेच नव्हे तर शासकीय कर्मचाऱ्यांना दमदाटी व मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणण्यासारखे गंभीर गुन्हे त्याने वारंवार केले होते. त्याच्या या त्रासाला स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक पूर्णपणे कंटाळले होते.
​
​आरोपीविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवली. आरोपी संजय विलास आरगडे व त्याच्या साथीदारांविरुद्ध भा.न्या.सं. कलम १०९, १११, ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपीने परिसरातून पळून जाण्याचा बेत आखला होता. मात्र, बार्शी तालुका पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने सापळा रचून, तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच अवघ्या काही तासांत त्याला बेड्या ठोकल्या.
5000अटक करण्यात आलेला आरोपी संजय आरगडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. समाजविघातक कृत्यांमुळे आणि परिसरात शांतता राखण्यासाठी त्याला यापूर्वी तडीपार (हद्दपार) देखील करण्यात आले होते. मात्र, तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती आणि तो पुन्हा गुन्हेगारी कृत्य करत होता. सोलापूर ग्रामीण ​पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना त्रास देणारे, दहशत माजविणारे, महिलांना त्रास देणारे, बेकायदेशीर सावकारी व अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून ही धडक कारवाई करण्यात आली.

​पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ मंगरुळे, पोहेकॉ बोबडे, पोहेकॉ खांडेकर, पोहेकॉ धनराज केकाण, पोकों ओमप्रकाश दासरे, पोकों राहुल बोंदर, पोकों गोविंद बचुटे, पोकों सुरेश बिरकले आणि चापोको शिवशंकर खराडे यांच्या टीमने सदरील कारवाई केली.
​
​”वरील नमूद आरोपीने किंवा इतर कोणत्याही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने सर्वसामान्य लोकांना त्रास दिला असेल किंवा त्यांच्याविरुद्ध काही तक्रार असेल, तर नागरिकांनी न घाबरता पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. तसेच बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनापरवाना बेकायदेशीर सावकारी करणे, दहशत माजविणे, दूध, अन्न किंवा इतर जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळ करणे, अथवा महिलांना त्रास देणे अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही माहिती असल्यास ती बार्शी तालुका पोलीस ठाण्यास द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.” असे आवाहन बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button