बार्शीतील पान शॉपवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा, प्रतिबंधित गुटखा जप्त, मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या धडक कारवाईमुळे बार्शी शहर व तालुक्यात अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्याच गोपनीय माहितीवरून बार्शी शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांना 1 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बार्शीतील हिरेमठ हॉस्पीटल जवळ, आगळगाव रोडवरील ‘मे. त्रिमूर्ती पान शॉप’मध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्याचे समजले. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तातडीने पथकासह छापा टाकला. यावेळी पान शॉप मालक संकेत भगवान लांडगे, वय 32, रा. सुभाष नगर, बार्शी याच्याकडे 15 प्रकारचे गुटखा सदृश पदार्थ मिळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवला.
या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन, सोलापूर यांना पत्र पाठवून तपासणीची विनंती केली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी रामानंद उमाशंकर स्वामी रात्री 10.45 वाजता बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. पंचासमक्ष जप्त मुद्देमालाची पाहणी केली असता त्यात सुपारी, सुगंधित तंबाखू, कात, चुना यांचे मिश्रण असलेले गुटखा, पान मसाला व सुगंधित सुपारी हे प्रतिबंधित पदार्थ आढळले.
रामानंद स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संकेत लांडगे याने महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी दि. 16 जुलै 2025 रोजी काढलेल्या अधिसूचना क्र. असुमाअ/411/2025/7 चे उल्लंघन केले आहे. राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखूचे उत्पादन, वाहतूक, साठा व विक्रीवर पूर्ण बंदी असताना आरोपीने आर्थिक फायद्यासाठी त्याचा साठा केला.
कारवाईदरम्यान प्रत्येक प्रकारचा नमुना तपासणीसाठी वेगळा काढण्यात आला व उर्वरित साठा जप्त करण्यात आला. पुरवठादाराबाबत विचारणा केली असता आरोपीने माहिती दिली नाही. प्रतिबंधित पदार्थाच्या विक्रीसाठी पान शॉपचा पुन्हा वापर होऊ नये म्हणून दुकान सील करण्यात आले आहे.
आरोपी संकेत लांडगे विरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26, 27, 30 सह नियमन 2011 तसेच भारतीय न्यायसंहितेचे कलम 223, 274, 275 व 123 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील पुरवठादार व इतर साखळीचा शोध घेण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.
दरम्यान, आयपीएस अंजना कृष्णा यांनी पदभार स्वीकारल्यापासून बार्शी उपविभागात अवैध धंद्यांविरुद्ध सलग धडक मोहीम सुरू ठेवली आहे. गुटखा, अवैध दारू व मटका अड्ड्यांवर सातत्याने कारवाई होत असल्याने अवैध व्यावसायिकांत घबराट पसरली आहे. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे. निर्भय पथकाचे बाबासाहेब घाडगे, हनुमंत पाडुळे आदींनी ही कामगिरी केली.




