प्रशासनमहाराष्ट्रसोलापूर

अधिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

भाविकांना सुलभ व जलद दर्शन देण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज, दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

पंढरपूर : (दि२५.)अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोंच्या संख्येने पंढरीत येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारुन सावली तयार करण्यात आली आहे. तर दर्शन रांगही वॉटरप्रूफ बनविण्यात आली आहे. यामुळे दर्शन रांगेत तासनतास थांबून भाविक दर्शन घेत आहेत. भाविकांना सुलभ, जलद व शांततेत दर्शन मिळावे म्हणून जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मंदिर प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. त्यानुसार व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत. दि.17 मे ते 15 जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी दर्शन रांगेंमध्ये मोठी गर्दी होत आहे. भाविकांना सुलभ, जलद व शांततेत दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शन रांगांचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पोलीस प्रशासन व मंदिर प्रशासनास दिले आहेत.5000कोणत्याही भाविकास अन्य मार्गाने किंवा नियमबाह्य पद्धतीने दर्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) अन्वये दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. काही इसमांकडून दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करून गोंधळ निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्हिआयपी दर्शनामूळे दर्शन रांगेतील भाविकांना वेळ लागत असल्याने तेही बंद करण्यात आले आहे.

दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणारे, नियमांचे उल्लंघन करणारे अथवा भाविकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात येतील. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या समन्वयातून भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुलभ दर्शन मिळण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.500

दर्शनाची वेळ पाहूनच रांगेत उभे रहावे

आषाढी व कार्तिकी यात्रेप्रमाणे अधिक मास कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन 24 तास उपलब्ध नसते. अधिक मास कालावधीत दररोज सकाळी 6.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत दर्शन व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. तसेच दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री 10.00 वाजता बंद करण्यात येत आहे. रात्री 12.00 ते पहाटे 4.00 या कालावधीत श्रींची विश्रांती असते. तसेच पहाटे 4.00 ते 5.00 या वेळेत काकड आरती व नित्य पूजा होत असल्यामुळे या कालावधीत दर्शन बंद राहते.तथापि, दर्शन बंद झाल्यानंतरही अनेक भाविक दर्शन रांगेत उभे राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. पहाटे 5.00 वाजता पुन्हा दर्शनास सुरुवात होत असल्याने सर्व भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊनच दर्शन रांगेत प्रवेश करावा, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.5009

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button