दादरच्या शिवाजी पार्कवर बाबासाहेबांना २ हजार ड्रोनच्या माध्यमातून मानवंदना
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर रविवारी सायंकाळी भव्य आणि नेत्रदीपक ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या संकल्पनेतून तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले.
तब्बल २ हजार ड्रोनच्या सहाय्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास आकाशात साकारण्यात आला. सायंकाळी सुमारे ७.५० वाजता सुरू झालेला हा शो जवळपास १४ मिनिटे चालला. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या या शोमध्ये बाबासाहेबांचे शालेय जीवन, महाड चवदार तळे सत्याग्रह, अस्पृश्यतेविरोधातील संघर्ष, भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीतील योगदान तसेच देशाचे पहिले कायदामंत्री म्हणून केलेले ऐतिहासिक कार्य आकर्षक प्रकाशचित्रे आणि ड्रोन फॉर्मेशनद्वारे साकारण्यात आले.
ड्रोनच्या सहाय्याने आकाशात उभी राहिलेली बाबासाहेबांची भव्य प्रतिमा, भारतीय संविधानाचे दृश्य आणि सामाजिक समतेचे संदेश पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाजी पार्क परिसर ‘जय भीम’ आणि देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमून गेला होता.
या आगळ्यावेगळ्या ड्रोन शोच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत सामाजिक समतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.









