कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत जमीन विक्रीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे, दि. ११ : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील भूमिहीन व दारिद्रय रेषेखालील शेतमजुरांच्या आर्थिक सबळीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या “कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना” अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दोन एकर बागायती किंवा चार एकर जिरायती जमीन १०० टक्के शासन अनुदान तत्त्वावर उपलब्ध करून दिली जाते. या योजनेंतर्गत कसण्यायोग्य जमीन विक्री करण्यास इच्छुक असलेल्या जमीन मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण जिल्हा पुणे कार्यालय, सामाजिक न्याय भवन, सर्वे नं. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनसमोर, येरवडा, पुणे – ४११००६. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ वर संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज. शेतजमीन विक्रीबाबत तहसीलदार कार्यालयाकडे केलेले मूळ प्रतिज्ञापत्र. सक्षम प्राधिकाऱ्यांचा ७/१२ चा मूळ उतारा. ८ अ उतारा व डायरी उतारा. वारसांचे/कुटुंबातील सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र. जमिनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत तलाठी यांचे प्रमाणपत्र. सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र. कृषि पतपुरवठा करणाऱ्या बँकांचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र. मोजणी विभागाचा टाचण व नकाशासह अहवाल. जमीन खरेदी प्रक्रिया व नुकसान भरपाईबाबत रु.१०० च्या स्टॅम्प पेपरवरील शपथपत्र. सदर जमिनीबाबत कोणताही न्यायालयीन वाद नसल्याचे प्रमाणपत्र. जमिनीचा वकिलांचा शोध अहवाल (Search Report) इ. संपूर्ण कागदपत्रांसह अर्ज संबंधित कार्यालयात सादर करावेत, असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांनी कळविले आहे.





