बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत 13 मे रोजी होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील सन 2025 ते 2030 या कालावधीतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1964 तसेच संबंधित नियमांनुसार ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर पत्रकानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला तसेच इतर प्रवर्गांसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ही आरक्षण सोडत मंगळवार, दि. 13 मे 2026 रोजी सकाळी 12 वाजता तहसील कार्यालय, बार्शी येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्ड, चावडी तसेच जाहीर ठिकाणी हे पत्रक प्रसिद्ध करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
तहसीलदार कार्यालयाने सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या प्रक्रियेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.





