रातंजन शिवारात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील रातंजन शिवारात सोमवारी सायंकाळी सुमारे ४० वर्षीय पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा मृत्यू अपघात आहे की घातपात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात असून पोलीस तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रातंजन येथील रावसाहेब लालासाहेब देशमुख यांच्या शेत गट क्रमांकातील उसाच्या शेतालगत सोमवार, ४ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला. शेतात काम करणाऱ्या मजुरांना प्रथम दुर्गंधी जाणवली. शोध घेतला असता झुडपात बेवारस मृतदेह दिसून आला.
याची माहिती तातडीने रातंजनचे पोलीस पाटील रमाकांत जाधव यांनी वैराग पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच वैराग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
ओळख पटवणे कठीण;
प्राथमिक तपासात हा मृतदेह सुमारे दोन दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. उन्हामुळे मृतदेह पूर्णपणे कुजला असून वन्य प्राण्यांनी चेहऱ्याचे व शरीराचे लचके तोडले आहेत. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. अंगावर मळका शर्ट आणि पँट असल्याचे आढळले. मात्र खिशात कोणतेही ओळखपत्र किंवा मोबाईल मिळालेला नाही.
शवविच्छेदनानंतर उलगडणार गूढ;
मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैराग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
परिसरात भीतीचे वातावरण;
घटनास्थळ निर्जन असून शेताजवळून जाणाऱ्या पायवाटेचा वापर कमी होतो. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे आणून टाकला असावा, असा संशय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. काहींनी अपघाताचीही शक्यता वर्तवली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
दरम्यान, या घटनेमुळे रातंजन व परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दिवसभर याचीच चर्चा होती. पोलिसांनी नागरिकांना अफवा न पसरवण्याचे आवाहन केले आहे. मृताची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती मागवली जात आहे.





