राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणास आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारी “लेक लाडकी योजना”
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महाराष्ट्र शासनाने राज्यातील गरीब कुटुंबांतील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लेक लाडकी योजना ही महत्त्वाकांक्षी योजना १ एप्रिल २०२३ पासून लागू केली आहे. ही योजना मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांच्या वयापर्यंत आर्थिक मदत पुरवून त्यांच्या शिक्षणाची सातत्यता पूर्ण करत आहे. ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्याचा एक मजबूत पाया ठरणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि समानतेच्या माध्यमातून मुली आत्मनिर्भर होतील आणि समाजाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील.
उद्देश:-
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, कुपोषण कमी करणे आणि बालविवाह रोखणे, मुलगा-मुलगी समानता प्रस्थापित करणे योजनेचा हा उद्देश समाजातील मुलींच्या स्थानाला बळकट करण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
आर्थिक मदत
या योजनेअंतर्गत मुलीला विविध टप्प्यांवर एकूण ₹१,०१,००० इतकी मदत दिली जाते:
- जन्मावेळी : ₹५००
- पहिली इयत्ता प्रवेशावेळी : ₹४,०००
- सहावी इयत्ता प्रवेशावेळी : ₹६,०००
- अकरावी इयत्ता प्रवेशावेळी : ₹८,०००
- १८ वर्षे पूर्ण झाल्यावर : ₹७५,०००
ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी आर्थिक आधार ठरणार आहे. ज्यामुळे मुलीच्या शिक्षणात ठीक आर्थिक अडचण येणार नाही.
पात्रता निकष
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचे स्थायी रहिवासी असावे
- पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक
- १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली पात्र

आवश्यक कागदपत्रे
- रेशन कार्ड (पिवळे/केशरी)
- मुलीचा जन्म प्रमाणपत्र
- माता-पित्याचे आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
अर्ज प्रक्रिया
अर्ज अंगणवाडी केंद्र, महिला आणि बाल विकास विभागामार्फत करता येतो.
लेक लाडकी योजना ही केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती समाजातील मुलींच्या स्थानाला उंचावणारी आहे. मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाल्याने बालविवाहासारख्या प्रथांना आळा बसेल. तसेच मुलगा-मुलगी समानतेचा संदेश समाजात दृढ होईल. ही महाराष्ट्र शासनाची दूरदृष्टी दाखवणारी योजना आहे. मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणापर्यंत शासनाने दिलेला हा आधार समाजातील परिवर्तनाचे द्योतक ठरेल.






