सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, डॉ. अतुल लकडे, डॉ. गौतम कांबळे व अन्य.
B1न्यूज मराठी नेटवर्क
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन; १४० पुस्तकांसह ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
सोलापूर, दि. ८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी, या सप्ताहाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अध्यासन समन्वयक डॉ. गौतम कांबळे, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. अनिल घनवट, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार, साहित्य व सामाजिक चळवळींवर आधारित विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनात एकूण १४० ग्रंथांचा समावेश असून, भारतीय संविधान, ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, डॉ. आंबेडकर यांचे लेखन व भाषण खंड तसेच ‘सोलापूरचे ऋणानुबंध’ यांसारख्या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे.
यावेळी प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि राजाभाऊ सरवदे यांनी आपल्या मनोगतातून सप्ताहाच्या शुभेच्छा देत, १४ एप्रिलपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.




