गुळपोळीच्या कन्येचा पोलीस दलात डंका; महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून कु. विद्या काळेचा सत्कार
गुळपोळीच्या कन्येची ‘खाकी’ला गवसणी; कु. विद्या काळेची पोलीस दलात निवड, महामानव संस्थेतर्फे गौरव सत्कार
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी गावची कन्या कु. विद्या दत्तात्रय काळे हिची सोलापूर शहरातील महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल तिचा गौरव सत्कार करण्यात आला. महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पुष्पहार, शाल आणि महापुरुषांचे पुस्तक देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
हा सत्कार संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी आणि दिपाली चौधरी यांच्या हस्ते पार पडला.
केवळ विद्याचाच नव्हे, तर आपल्या पाल्याला या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी झटणाऱ्या तिच्या आई-वडिलांचाही यावेळी पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला गुळपोळी गावचे पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे, युवा उद्योजक किरण खुरंगळे, श्रेयश काळे, दत्तात्रय काळे, वंदना काळे, सुभद्रा चौधरी, रंजना खुरंगळे, दिपाली चौधरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कु. विद्या काळे हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. एका सामान्य कुटुंबातील लेकीने खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवत इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यशाची प्रेरणा :
“सामान्य कुटुंबातील मुला-मुलींनी जर ध्येय निश्चित केले आणि त्यासाठी प्रामाणिक मेहनत घेतली, तर यश नक्कीच मिळते,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. विद्याच्या या यशामुळे गुळपोळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ग्रामीण भागातील इतर मुलींसाठी ती एक प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
ताज्या घडामोडी क्षणाक्षणाला मिळविण्यासाठी B1न्यूज मराठी पोर्टलला भेट द्या.





