क्राईमबार्शीमहाराष्ट्र

शेळ्या-बोकड लुटणारे चार आरोपी जेरबंद, 85 हजारांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : तालुक्यातील चिखर्डे गावच्या शिवारात शेतात घुसून शेतकऱ्याला मारहाण करत शेळ्या, बोकड व रोख रक्कम लुटल्याची गंभीर घटना घडली होती. मात्र या प्रकरणाचा पांगरी पोलिसांनी उलगडा करत चार आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत रितेश पांडुरंग मोहीते (वय 21, रा. चिखर्डे, ता. बार्शी) यांनी पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या माहितीनुसार, दि. 30 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजता ते शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेले असताना मोटारसायकलवरून तीन अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी शेडमध्ये घुसून दावणीला बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपींनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत “गप्प बस, नाहीतर जीवे मारू” अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी दोन शेळ्या, एक बोकड व फिर्यादीच्या खिशातील 2 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटून पळ काढला.5000या घटनेत अंदाजे 15 हजार रुपये किंमतीचा एक बोकड, 20 हजार रुपये किंमतीच्या दोन शेळ्या व 2 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 37 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पांगरी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अजमेर ताजोद्धीन कोतवाल, सुरज नेताजी नागटिळक, बाळकृष्ण सुरेश फिस्के व बाबासाहेब सुरेश गायकवाड (सर्व रा. मळेगाव) यांना अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन शेळ्या, एक बोकड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण सुमारे 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस हवालदार सचिन माने, शबीर शेख तसेच पोलीस कॉन्स्टेबल संगम वडले, रामा शिंदे, बळीराम बेदरे, चालक आशिष कुमार सानप व सायबर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रतन जाधव यांचा समावेश होता.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button