बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची बार्शी शहरात जोरदार तयारी सुरू असून, जयंती उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बार्शी पोलिसांनी शहरात रूट मार्च काढून सतर्कता दाखवली.
दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत हा रूट मार्च काढण्यात आला. संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी दंगा काबू योजना (Riot Control Drill) यशस्वीपणे राबविली.
हा रूट मार्च शिवसृष्टी – संविधान चौक – भीम नगर – सिद्धार्थ नगर – हांडे गल्ली – कोर्ट चौक – तानाजी चौक – शिवसृष्टी या मार्गावरून काढण्यात आला. शहरातील मिश्र वस्ती तसेच संवेदनशील भागांमधून रूट मार्च घेऊन पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला.
या मोहिमेत बार्शी शहर पोलीस ठाण्याकडील ६ पोलीस अधिकारी, २३ पोलीस अंमलदार व ३४ होमगार्ड सहभागी झाले होते.
रूट मार्चच्या माध्यमातून बार्शी पोलिसांनी नागरिकांना महापुरुषांच्या जयंती शांतता, शिस्त व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवा, गैरप्रकार किंवा अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. बार्शीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, त्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र या रूट मार्चमधून दिसून आले.




