दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन योजनांची माहिती व लाभ घेण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सातारा दि. 11: दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरुन विविध योजनांची माहिती व लाभ घेणेसाठी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन अर्ज तसेच या पोर्टलवर राज्य व केंद्र शासनाच्या एकुण १७ योजनांची माहिती लाभार्थ्यांना मिळणार आहे. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणा-या संस्थांना सदर पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य असून संस्थांची नोंदणी व नुतणीकरण दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर होणार आहे.
दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना, सेवा आणि लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित केलेले एक खिडकी प्रणाली (Single Window) डिजिटल व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे पारदर्शक, कार्यक्षम व कालबद्ध सेवा वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतो.
या पोर्टलचा मुख्य उद्देश दिव्यांगांना शासकीय कल्याणकारी सेवा सुलभपणे आणि एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे त्याद्वारे त्यांचे साक्षमीकरण करणे हा आहे. तरी दिव्यांग व्यक्तींनी https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in या पोर्टलचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी विद्यानंद चल्लावार यांनी केले आहे.





