छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान वडवळ नागनाथ येथे आयोजित समाधान शिबिराचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0

नागरिकांना शासकीय प्रमाणपत्रे, योजनांच्या लाभ पत्राचे वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळवून देण्यासाठी चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी विविध शासकीय योजना मंजुरी प्रमाणपत्रे, दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, जिल्हा परिषद सदस्य भानुदास पोटे, पंचायत समिती सदस्य मिरावती कसबे, गजानन होनराव, भुजंगराव शिंदे, वडवळ नागनाथचे सरपंच मुरलीधर सोनकांबळे यांच्यासह वडवळ नागनाथ महसूल मंडळातील सरपंच व नागरिक यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिरामुळे एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा, योजनांचा लाभ मिळत आहे. महसूल विभागामार्फत पांदण रस्ते, शेत रस्त्याची कामे केली जात आहेत. यासाठी सुटसुटी धोरण तयार करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांसाठी आवश्यक दाखले वाटपाची कार्यवाही गतिमान करण्यात आली असल्याने नागरिकांची गैरसोय दूर झाली असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला असून शेती आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी यामध्ये भरीव तरतूद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.5000उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी समाधान शिबिराच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, सेवा महसूल मंडळात एकाच छताखाली मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव यांनी प्रास्ताविक केले. महसूल विभागाच्या योजना, सेवांची माहिती व लाभ देण्यासोबतच इतरही शासकीय विभागांच्या योजनांची माहिती समाधान शिबिराच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या शिबिरात महसूल विभागाच्या जवळपास पंधरा सेवा देण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका, आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, महिला व बालविकास विभागामार्फत बेबी कीटचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांच्या गटासाठी अनुदान धनादेश वितरण करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरानिमित्त उभारण्यात आलेल्या स्टॉल्सला सहकार मंत्री पाटील यांनी भेट देवून उपलब्ध सेवांची माहिती घेतली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या