बार्शीत रात्री तलवारी सह हल्ला; घरात घुसून तोडफोड व लूट
बहिणीवर वार, भावाचा हात जखमी, मेव्हण्याचा हात फ्रॅक्चर, वाहनांची तोडफोड सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील उपळाई रोड, शिंदे प्लॉट परिसरात १९ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास तलवारी व लाकडी दांडक्याने घरावर हल्ला, मारहाण, तोडफोड व लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गणेश अरूण बोरगावकर (वय ३८, व्यवसाय ट्रान्सपोर्ट व फायनान्स) यांनी संबंधितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, काही दिवसांपासून एका मुलीच्या बेपत्ता होण्याच्या कारणावरून संशय घेत संबंधितांकडून त्यांच्या बहिणीच्या कुटुंबावर राग धरला जात होता. घटनेच्या रात्री सिद्धेश्वर शेळके, सोनाली शेळके व शशिकांत गवारे हे संगिता डाके यांच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ करून “तुमचा मुलगा कुठे आहे, त्याला जिवे मारतो” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, फोनवरूनही चौकशी करत दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. त्याच वेळी सिद्धेश्वर शेळके यांनी शर्टामध्ये लपवून ठेवलेली तलवार काढून संगिता डाके यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार अडविताना गणेश बोरगावकर यांच्या डाव्या हाताच्या पंजावर गंभीर जखम झाली व रक्तस्राव सुरू झाला. यानंतर बालाजी चव्हाण, चंद्रकला चव्हाण, प्रकाश चव्हाण व इतर जण लाकडी दांडके घेऊन घटनास्थळी आले. चंद्रकला चव्हाण यांनी दामोदर डाके यांच्या डाव्या हातावर दांडक्याने मारून फ्रॅक्चर केल्याचा आरोप आहे. तसेच बालाजी चव्हाण यांनी तलवार घेऊन त्यांच्या उजव्या हातावर वार केला. इतरांनीही हातापायांवर व पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
हल्लेखोरांनी घरात घुसून खिडक्यांच्या व दरवाज्यांच्या काचा फोडल्या, हॉल व किचनमधील साहित्याची तोडफोड केली. या गोंधळात फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील अंदाजे दीड लाख रुपये रोख रक्कम काढून घेतल्याचा तसेच पत्नीच्या गळ्यातील सुमारे १० हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसकावल्याचा आरोप आहे.
याशिवाय घरासमोरील आयशर ट्रक (MH15FV7293), स्विफ्ट डिझायर कार (MH12QW2902) तसेच दोन स्क्रॅप रिक्षांच्या काचा दगड, दांडके व तलवारीने फोडून अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच भाचा गौरव डाके याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात गणेश बोरगावकर व दामोदर डाके हे जखमी झाले असून उपचारानंतर उशिरा तक्रार देण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२),१९३(३),१९०,११८(१),११८(२), ११९(१), ३३३,३२४(४),३५१(२),३५१(३),३५२,४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.





