श्री शिवाजी महाविद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती उत्साहात संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वृत्तपत्र हे विविध घडामोडींची माहिती देणारे महत्त्वाचे माध्यम आहे. अर्थातच वृत्तपत्रातील माहिती पडताळून सत्याची कास धरली पाहिजे. त्यासाठी पत्रकारांनी निःपक्ष व निःस्वार्थी वृत्तीने कार्य करीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ भक्कम केला पाहिजे, असे मत वार्ताहर प्रशांत खराडे यांनी व्यक्त केले. येथील श्री शिवाजी महाविद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे कला शाखा समन्वयक प्रा. डॉ. बी. डी. पारसे, उत्सव समितीची चेअरमन डॉ. एस. बी. शिंदे, आयक्यूएसी सहसमन्वयक प्रा.डॉ. एस. डी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना खराडे म्हणाले, पत्रकारिता हे आव्हानाचे क्षेत्र आहे. पत्रकारांचे कार्य समाजजागृतीचे आहे.दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांची अष्टपैलू बुद्धिमत्ता, समाजोद्धाराची दृष्टी आणि स्वदेशोन्नतीची आत्यंतिक कळकळ त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक अशा विविध क्षेत्रांतील त्यांनी केलेल्या लेखनावरून स्पष्ट होते.
शिक्षकांद्वारे सामाजिक जागृती होऊ शकेल अशी त्यांची धारणा होती. अध्यक्षीय मनोगतात डॉ. पारसे म्हणाले,अज्ञानात बुडालेल्या समाजाला ज्ञान देण्यासाठी जे जे मार्ग अवलंबिता येतील ते ते मार्ग जांभेकरांनी अवलंबिले. समाजात असलेल्या तत्कालीन रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व समजुती यांवर त्यांनी प्रहार केला. समाजातील दुष्ट रूढीविरुद्ध त्यांनी आवाज उठविला व लेखणीही चालविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. एस. बी. शिंदे यांनी बाळशास्त्री जांभेकराच्या कार्याची समकालीन उपयुक्तता मांडली.
डॉ. राहुल पालके यांनी पत्रकारितेची सामाजिक उपयुक्तता मांडून उपस्थितांचे आभार मानले. दर्पणकार प्रबोधनाचे पुरस्कर्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक, वाड्.मयीन, वृत्तपत्रविषयक कार्याचा परिचय या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.





