शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांची सुयश विद्यालया मधील अत्याधुनिक संगणक कक्षाला सदिच्छा भेट
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सुयश विद्यालय, बार्शी येथे माननीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
यावेळी मोरे यांनी शाळेतील अत्याधुनिक संगणक कक्षाची पाहणी केली. संगणक कक्षामध्ये उपलब्ध असलेली आधुनिक संगणक प्रणाली, इंटरनेट सुविधा, डिजिटल अध्यापन पद्धती तसेच विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी शाळेने केलेली तयारी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. बदलत्या काळाच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणे ही काळाची गरज असून सुयश विद्यालय या दिशेने सक्षमपणे कार्यरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
शाळेतील स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरण, शिक्षकांचा अध्यापनातील सहभाग, विद्यार्थ्यांचा उत्साह तसेच शैक्षणिक गुणवत्तेकडे असलेले लक्ष याबाबत माननीय मोरे साहेब यांनी प्रशंसा केली. “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कौशल्याधारित, तंत्रज्ञानाधिष्ठित व मूल्याधारित शिक्षण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे,” असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.
या भेटीदरम्यान संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक नलवडे साहेब यांच्या वतीने मोरे साहेब यांचे स्वागत करण्यात आले व शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा त्यांच्यासमोर सादर करण्यात आला.
या सदिच्छा भेटीमुळे सुयश विद्यालयाच्या शिक्षकवृंदाला व विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असून भविष्यात अधिक गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास बळ मिळाले आहे.




